
सामना प्रतिनिधी । मुंबई
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनने 8 जानेवारीला पुकारलेल्या संपाबाबत आज दिवसभरात कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे या संपाचे भवितव्य सोमवारीच ठरणार आहे. सोमवारपर्यंत प्रशासनाने काहीच ठोस आश्वासन दिले नाही किंवा चर्चेला बोलावले नाही तर मात्र हा संप होण्याची शक्यता आहे.
बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करावा, कामगारांच्या मागणी पत्रावर चर्चा करावी, निवृत्त कर्मचाऱयांना ग्रॅच्युइटी, संपलेला वेतन करार पुन्हा करावा, दिवाळीपूर्वी जाहीर केलेले 5500 रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, कर्मचाऱयांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवावा आदी मागण्यांसाठी बेस्टच्या कामगार कृती समितीने 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. शुक्रवारी प्रशासनाबरोबरची बोलणी फिस्कटल्यानंतर संप अटळ असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनने म्हटले होते. कर्मचाऱयांच्या मागण्यांसंदर्भात सोमवारी महाव्यवस्थापक किंवा पालिका आयुक्त काय निर्णय घेतात याकडे कामगारांचे आणि संघटनांचे लक्ष लागले आहे.
कामगार सेनेचा मेळावा
दरम्यान, या संपाला कामगार सेनेने आधीच नैतिक पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी संप झालाच तर काय करायचे याची दिशा ठरवण्यासाठी आज बेस्ट कामगार सेनेच्या सदस्यांचा शिवसेना भवन येथे मेळावा घेण्यात आल्याची माहिती सुहास सामंत यांनी दिली.
…तर आमचे कामगार घरी राहतील
संप होऊ नये अशीच आमची इच्छा आहे. त्याकरिता प्रशासनाने ताबडतोब बोलणी सुरू करावीत, ठोस आश्वासन द्यावे. मात्र तसे काही झाले नाही तर या संपाला आम्ही विरोध करणार नाही. बेस्ट कामगार सेनेचे सदस्य संपाच्या दिवशी आंदोलनात सहभागी होणार नाहीत, पण गैरहजर राहून आपला निषेध व्यक्त करतील. – सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना



























































