भाजप खऱ्या मतदार याद्यांमध्ये फेरफार करून बोगस मते तयार करते, पंजाबमध्ये आम्ही हे अजिबात घडू देणार नाही; SIR प्रक्रियेवरून भगवंत मान यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी भाजपवर नेत्यांच्या कथित फोडाफोडीवरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करत मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पटणा येथे बोलताना मुख्यमंत्री भगवंतमान म्हणाले की, “इतर पक्षांतील आमदारांची फोडाफोडी करण्याऐवजी भाजपने देशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. येत्या १५ जूनपासून एसआयआर प्रक्रिया सुरू होत आहे. हे लोक खऱ्या मतदार याद्यांमध्ये फेरफार करून बोगस मते तयार करतात आणि आम्ही पंजाबमध्ये असे अजिबात घडू देणार नाही.”

निवडणूक आयोगाने (ECI) घोषित केलेल्या आगामी SIR च्या तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेवरून पंजाबमधील राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्री मान यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधील ३६ कोटींहून अधिक मतदारांचा समावेश केला जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, पंजाबमध्ये १५ जूनपासून पूर्वतयारीचा टप्पा सुरू होईल. त्यानंतर २५ जून ते २४ जुलै दरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन भेटी देतील आणि अंतिम मतदार यादी १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल.