
सामना प्रतिनिधी । बीड
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीडच्या वतीने भव्य महिला भजनी मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात 28 महिला भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. नाट्य परिषदेची ही भजनी स्पर्धा ऐतिहासिक ठरली. भक्तीमय वातावरणात नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ.दिपा क्षीरसागर, परिवर्तन प्रतिष्ठाणचे डॉ.सतीश साळूंके, डॉ.सारिका क्षीरसागर, पुष्पा पांगारकर, ज्येष्ठ गायक भरत लोळगे, संजय पाटील देवळाणकर, मिलिंद शिवणीकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
नाट्य परिषद आयोजीत भजन स्पर्धेत 400 महिलांनी उत्सफूर्त सहभाग नोंदवला या स्पर्धेचे प्रथम पारितोषीक सरस्वती भजनी मंडळ, द्वितीय पारीतोषीक गजानन भक्ती कंट्रक्शन भजनी मंडळ तर तृतीय क्रमांक विठाई संस्कृती भजनी मंडळ यांनी पारितोषीक पटकावले तर उत्तेजनार्थ बक्षीस जगन्नाथ भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, राजस्थानी भजनी मंडळ यांना देण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मिरा संस्थानच्या मठाधीपती ह.भ.प.राधाताई सानप, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ.दिपा क्षीरसागर, ज्येष्ठ गायक भरत लोळगे, डॉ.विद्यासागर पाटांगणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ह.भ.प.राधाताई सानप म्हणाल्या की, संत ज्ञानेश्वर व संत मिराबाईवर पी.एच.डी. करणार्या डॉ.दिपाताईंचा अभिमान वाटतो. महिलांनी घराबाहेर पडून स्वतःचे अस्तित्व सिध्द करायला हवे. अध्यात्मात सर्वात पहिले आरक्षण शंकराने पार्वतीला अर्धांगिनी बनून दिले होते. वारकरी सांप्रदायात महिलांना आरक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी दिले.
यावेळी बोलताना डॉ.दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, बीडमध्ये अध्यात्माचा झरा वाहतो आहे याचीच एक गंगा आज भजन स्पर्धेच्या माध्यमातून वातावरण पवित्र करून गेली. सहभागी झालेले सर्वच स्पर्धक विजेतेच असतात. विजेत्या स्पर्धकांच्या गुणकौशल्यावर कौतुकाची थाप देण्यासाठी बीड नगरीचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात बक्षीस जाहीर केले.
यावेळी बोलताना भरतबुवा रामदासी म्हणाले की, जन्म मरणाच्या फेर्यातून सुटका करण्यासाठी परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन आहे. भजनी मंडळांच्या स्पर्धांचे परिक्षक म्हणून प्रा.राहूल सोनवणे आणि नामदेव साळूंके यांनी केले तर सुत्रसंचलन सुरेश साळूंके यांनी केले. सकाळी 11.00 वा. सुरू झालेली ही स्पर्धा 4.00 वा. संपली. या स्पर्धेसाठी जवळपास 400-500 महिला उपस्थित होत्या. भक्तीमय वातावरणात विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
























































