भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी लावले बॅनर; परिसरात दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भामरागड तालुक्यातील ताडगावपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर गावाबाहेरील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री लाल रंगाचे दोन बॅनर लावले. तसेच या रस्त्याच्या मधोमध दोन डब्बे ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड गुंडाळून डब्ब्याच्या दोन्ही बाजुला वायर जोडल्या होत्या. त्यात स्फोटके असल्याच्या संशयावरून भामरागड -आलापल्ली या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळपासून ठप्प होती.

ताडगाव हे भामरागड -आलापल्ली मुख्य मार्गावरील गाव असून या गावापासून ताडगाव पोलीस मदत केंद्र अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस मदत केंद्राच्या हाकेच्या अंतरावरील ताडगाव या गावाबाहेर नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री कापडी बॅनर बांधले व दोन डब्बे रस्त्याच्या मधोमध ठेवले होते. त्यामुळे नक्षल्यांची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे. या लालरंगाच्या कापडी बॅनरवर भाकपा माओवादी पेरमिली ऐरिया कमिटी असा मजकूर लिहिलेला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नक्षल्यांची दहशत पसरली आहे. या नक्षली बॅनर व डब्ब्यामुळे मंगळवार सकाळपासून भामरागड -आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने परिसरातील नागरिक व प्रवाशांना प्रचंड त्रास सोसावा लागला. दरम्यान, दुपारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. नक्षली बॅनर काढून मार्ग सुरळीत केला. नक्षल्यांचे बॅनर्स पोलिसांनी ताडगावच्या मुख्य चौकात आणून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते जाळले. यावेळी शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.