भंडारी समाजाचे आज आझाद मैदानात उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवसायनात गेलेल्या भंडारी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या गोरेगाव पूर्व येथील मालमत्ता लिलावात गैरव्यवहार झाला असून त्याला राज्याच्या सहकारमंत्र्यांकडून पाठीशी घातले जात आहे. त्याच्या निषेधार्थ भंडारी समाज आक्रमक झाला असून भंडारी मंडळ दादर, शेअर होल्डर फोरम ऑफ भंडारी को-ऑपरेटिव्ह बँक आणि अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या वतीने शुक्रवार, 24 डिसेंबर रोजी आझाद मैदानात साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

भंडारी बँकेची गोरेगाव पूर्व येथे 7-8 कोटी रुपयांची एक मालमत्ता आहेत. तिची विक्री करताना बँकेच्या अवसायकाने लिलाव खासगी संकेतस्थळावर केल्याने सदरची मालमत्ता खरेदीदाराला केवळ चार कोटी 30 लाख रुपयांमध्ये मिळाली आहे. याविरोधात सहकार आयुक्तांकडे दाद मागताच त्यांनी सदरच्या लिलावाला दिलेली मंजुरी रद्द केली आहे. त्यानंतरही नियम धाब्यावर बसवून झालेल्या लिलाव प्रक्रियेला सहकारमंत्री पाठीशी घालत असल्याने भंडारी समाजामध्ये नाराजी आहे. याविरोधात लढा उभारण्यासाठी आज भंडारी मंडळ, दादर येथे बैठक झाली. यामध्ये उपोषणाचा निर्णय झाल्याची माहिती विश्वस्त शंकर हळदणकर यांनी दिली.