अबब! 6 फूट लांब अन दीड किलो वजन, चवळीची शेंग पाहण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात बघ्यांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येभील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात पाच ते सहा फूट लांबीची चवळीची शेंग पिकविली आहे. मुनेश्वर राऊत या शेतकऱ्याने शेतीत हा प्रयोग केला आहे. हे बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. ग्रामीण भागातील या शेतकऱ्याने केलेला हा प्रयोगही अनेकांसाठी कुतुहलाचा आणि शेतकऱ्यांना नवीन काहीतरी मार्ग दाखविणारा आहे.

पारंपारिक नानाच्या शेतीसोबतच राऊत यांनी घराशेजारी असलेल्या शेतात भाजीपाला पीक म्हणून ब्रिंजल जातीच्या चवळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्याच्या प्रारंभी या शेतकऱ्याने पंचवीस वेलवर्गीय झाडे शेतात लावली. त्यापैकी दोन वेल काही कारणांनी नष्ट झाले. मात्र इतर वेलींच्या संवर्धनासाठी त्याने मांडव घालून अनेक उपाययोजना केल्या. आज या झाडाला फळ येऊन एका वेलाला नऊ ते दहा चवळीच्या शेंगा लागल्या आहेत.

एरवी चवळीची शेंग म्हणजे बारकी आणि आकाराने छोटी अशीच आपल्या नजरेसमोर येते. परंतु ही शेंग दोडक्या नाही आणि दुधी भोपळालाही लाजविणारी आहे. शेंगांची लांबी 5 ते 6 फूट आहे. गोलाई म्हणजे जाडी 6 ते 7 सेंटीमीटर आहे. वजन तब्बल एक ते दीड किलोच्या घरात आहे. चवळीच्या शेंगाची चव कोवळ्या दोडक्या प्रमाणे असल्याचे सांगितले जाते. पहिल्यांदाच बाजारात आलेली ही शेंग अनेकांसाठी कुतूहलाचा विषय बनली आहे.