भंडारा: पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदानावर गेलेल्या तिघांना कुत्र्याचा चावा; बेवारस कुत्र्यांचा हैदोस

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील एका विद्यालयाच्या मैदानात पोलीस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या तीन तरुणांना कुत्र्याने पाठलाग करून चावा घेतल्याची घटना घडली. त्यामुळे या मैदानावर नियमितपणे येणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून यात लंकेश मुरलीधर इखार, स्वप्नील नागलवाडे आणि रितीक निर्वाण हे तिघे जखमी झाले आहेत.

लाखनी शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पोलीस भरतीच्या सरावासाठी सकाळी आणि सायंकाळी येत असतात याच बरोबर लाखनी, मुरमाडी सावरी गावातील मुले, तरुणी आणि वृद्ध देखील आरोग्य टिकवण्याच्या उद्देशानं पायी फिरण्याकरिता व खेळण्याकरिता या मैदानावर प्रचंड गर्दी करतात. आता या घटनेमुळे नागरिकांत दहशत पसरली असून लाखनी नगर पंचायतने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.