भंडारदरा धरणाजवळ मद्यधुंद पर्यटकांची पोलिसांना मारहाण, सहा जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारदरा धरणात बुडालेल्या तरुणाचा शेध घेत असताना, तेथे गर्दी करण्यास मज्जाव केल्याने मद्यधुंद पर्यटकांनी ग्रामस्थ व पोलिसांना बेदम मारहाण केल्याची घटना भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत एका स्थानिकासह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राजूर पोलिसांनी या घटनेत सामील असणाऱया सहाजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कर्मचारी संजय शिंदे आणि स्थानिक ग्रामस्थ प्रकाश खाडे हे यात जखमी झाले आहेत. अजित बाळासाहेब शिंदे, (रा. ठाणगाव, ता. सिन्नर), किरण कोंडाजी उगले, आकाश सतीश उगले (दोघे रा. डोंगरगाव, ता. अकोले), विनोद संतोष औटी (रा. वाघापूर, ता. अकोले), ज्ञानेश्वर विश्वास कदम (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले), ज्ञानेश्वर गणपत लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल रवींद्र रंगनाथ गोंधे यांनी फिर्याद दिली आहे.

भंडारदरा धरणात एक पर्यटक बुडाल्याची माहिती मिळाल्याने राजूर पोलीस सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. तेथून परतत असताना घटनास्थळी जाण्यास पोलिसांनी व ग्रामस्थांनी पर्यटकांना मज्जाव केला होता. त्यामुळे चिडलेल्या काही मद्यधुंद पर्यटकांनी पोलिसांना दमबाजी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे स्थानिक व्यावसायिक प्रकाश खाडे हे मध्यस्थी करीत असताना पर्यटकांनी त्यांना जबर मारहाण केली. यानंतर पोलिसांनी त्यांना अडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता, ‘आम्ही कायदा मानत नाही, आम्ही आर्मीमध्ये आहोत. तुम्हाला काय करायचे ते करा?’ असे म्हणत त्यांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी त्या पर्यटकाना चांगलाच चोप देत राजूर पोलीस ठाण्यात आणले.

घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस नाईक दत्तात्रय परते उपस्थित होते. धिंगाणा घालणारे पर्यटक हे संगमनेर व अकोले तालुक्यांतील वडगाव लांडगा, वाघापूर, हिवरगाव आंबरे येथील असून, त्यांतील दोघे काळे व औटी हे सैन्य दलात काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

बंदी असूनही पर्यटनासाठी गर्दी

भंडारदरा धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करून मोठी गर्दी केल्याचे शुक्रवारी दिसून आले. वीकेण्डला या परिसरात पर्यटनावर बंदी घालण्यात आली असली, तरी पर्यटक येथे गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.