भंडारदऱ्यात 25 मे पासून ‘काजवा महोत्सव’ सुरू, हजारो पर्यटक दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरातील कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सव 25 मे ते 15 जूनपर्यंत साजरा होणार आहे. यावर्षी पर्यटकांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळणार असण्याची शक्यता आहे. या काजवा महोत्सवासाठी अगोदरच बुकिंग करण्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱया कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरू होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहूल असते. हिरडा, बेहडा, सादडा यांसारख्या झाडांवर कोटय़वधींच्या संख्येने स्वयंप्रकाशित काजवा कीटक एकाच वेळेस लयबद्ध पद्धतीने चमकत असतात. हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी 25 मे ते 15 जूनपर्यंत हजारो पर्यटक भंडारदऱयात दाखल होत असतात.

याही वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरू होण्याची शक्यता असून, अनेक पर्यटकांनी आपल्याला काजव्यांचा हा करिष्मा व्यवस्थित बघता, यावा म्हणून टेन्टधारक व हॉटेलमध्ये ऍडव्हान्स बुकिंग केले आहे. काही ऑर्गनायझर्सनी ‘काजवा महोत्सवा’मध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वन विभागाकडून जोरदार तयारी सुरू असून, पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही आयोजित करण्यात आली आहे. भंडारदरा धरण परिसरातील हॉटेल व्यावसायिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण, गाईड व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत.

यंदा काजवा महोत्सवासाठी प्रचंड गर्दी होणार असल्याने रात्री दहानंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही, तर ठिकठिकाणी पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

– गणेश रणदिवे,

सहायक वनसंरक्षक अधिकारी, नाशिक

पर्यटकांनी काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे. मद्यपान करून धांगडधिंगा करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

– गणेश इंगळे,

सहायक पोलीस निरीक्षक, राजूर