
जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोटात 15 दिवसांत झालेल्या पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा झाला असतानाच दोन दिवसांपासून, पाणलोटात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. शनिवारी तर बहुतांश भागात सूर्यदर्शन झाले असून, धरणांमधील आवक मोठय़ा प्रमाणात खालावली आहे. परिणामी भंडारदरा धरण भरण्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. सध्या धरणात 1 हजार 273 क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत असून, तितक्याच प्रमाणात धरणातून पाणी सोडले जात असल्याने भंडारदरा धरणाची पाणीपातळी 88.58 टक्क्यांवर स्थिरावली आहे. मुळा खोऱयातील पावसानेही आता विश्रांती घेतली असून, कोतुळनजीक मुळापात्रातूनही 1 हजार 273 क्युसेकने पाणी वाहत आहे. आढळा धरणक्षेत्रात अद्यापि चिंता कायम असून, धरणाला नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जिह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पुनरागमन करणाऱया पावसाने अवघ्या पंधरा दिवसांतच तीनही धरणांचे जलसाठे समाधानकारक अवस्थेत नेऊन पोहोचवले आहेत. मात्र, गुरुवारी सायंकाळपासून पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झाली आणि शनिवारी (दि. 7) पहाटेपासूनच पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. मुळा व प्रवरा नद्यांच्या संपूर्ण खोऱयात सध्या सारखीच स्थिती अनुभवण्यास मिळत आहे. भंडारदरा व मुळा धरणात आज सकाळपासून एकसारख्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे. मुळा नदीच्या पाणलोटातील पावसाचे आगार असलेल्या हरिश्चंद्रगडावरील पाऊसही थांबला असून, कृष्णावंतीचा उगम असलेल्या कळसुबाईच्या शिखरांवरही आज सूर्यदर्शन झाले आहे.
गेल्या 24 तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील पांजरे येथे सर्वाधिक 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटघर व रतनवाडीत प्रत्येकी नऊ मिलिमीटर, तर भंडारदऱयात अवघा सात मिलिमीटर पाऊस झाला आहे.
निळवंडे धरणाच्या पाणलोटातील पाऊसही उघडला असून, 24 तासांत वाकी येथे अवघा सहा मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे वाकीच्या जलाशयावरील पाण्याचा विसर्गही रोडावल्याने निळवंडे धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. सध्या वाकी जलाशयाचा 197 क्युसेकने आणि भंडारदरा धरणातून सोडले जात असलेले 1 हजार 273 क्युसेकने पाणी धरणात जमा होत आहे. मुळा खोऱयातील पावसाचे मोजमाप करण्याचे कोणतेही शाश्वत साधन नसून, कोतुळनजीक मुळापात्रातून वाहणाऱया पाणीपातळीवरूनच त्याचा अंदाज बांधला जातो. 24 तासांत कोतुळ परिसरात पावसाची नोंदही झालेली नाही.
आढळा लाभक्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षा
मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटातील पावसाने विश्रांती घेतली असली तरीही धरणातील एकूण पाणीसाठे समाधानकारक अवस्थेत पोहोचलेले आहेत. मात्र, अकोले तालुक्यातील देवठाणनजीक आढळा नदीवर बांधण्यात आलेले 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या धरणाचा पाणीसाठा सध्या 49.24 टक्के असून, अपवाद वगळता धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नाही. 177 चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र लाभलेल्या या धरणावर 3 हजार 914 हेक्टर रब्बी क्षेत्र व 780 हेक्टर खरिपाचे क्षेत्र अवलंबून आहे. 1976 साली लोकार्पण झाल्यापासून 26 वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यंदा मात्र ऑगस्ट महिना उजाडूनही धरणाच्या पाणलोटातील पावसाला जोर चढत नसल्याने लाभक्षेत्रात चिंता निर्माण झाली आहे.



























































