कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्याची क्षमता असायला हवी – भारत अरुण

394

हिंदुस्थानचा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. एखादा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला तर त्याला खेळपट्टीची चिंता नसायला हवी. कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्याची क्षमता त्या संघातील खेळाडूंमध्ये असायला हवी. कोणत्याही खेळपट्टीवर किंवा कोणत्याही वातावरणात आपण आपल्या घरात खेळतो असे वाटायला हवे, असे स्पष्ट मत टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी यावेळी व्यक्त केले. हिंदुस्थानदक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पुणे येथे 10 ऑक्टोबरपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

हिंदुस्थानी संघ परदेशात जातो तेव्हा खेळपट्टीवर आमचे लक्ष नसते. दोन्ही संघांसाठी एकसारखीच खेळपट्टी असेल असा विचार आम्ही करतो. खेळपट्टीवर ध्यान देण्यापेक्षा आमची गोलंदाजी धारदार बनवण्याकडे आमचा कल असतो, असे भारत अरुण यावेळी आवर्जून म्हणाले.

गोलंदाज रिव्हर्स स्विंगमध्ये तरबेज

टीम इंडियाचे गोलंदाज रिव्हर्स स्विंगमध्ये तरबेज आहेत. याचा फायदा आम्हाला होत आहे. हिंदुस्थानातील खेळपट्टय़ा या पाटा असतात. आऊटफिल्डही अव्वल दर्जाचे नसते. अशा परिस्थितीत रिव्हर्स स्विंगवर अवलंबून राहावे लागते, असे भारत अरुण यावेळी म्हणाले.

कोहलीकडून गोलंदाजांना सूट

विराट कोहली गोलंदाजांना सूट देत असल्यामुळे गोलंदाजांना मनासारखी कामगिरी करता येत आहे. मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह या गोलंदाजांना शॉर्ट स्पेलमध्ये गोलंदाजी करायला दिले जाते. इशांत शर्मा मात्र लाँग स्पेल गोलंदाजी करू शकतो. मोहम्मद शमीच्या शानदार गोलंदाजीमुळेच आम्हाला पहिल्या कसोटीत पुनरागमन करता आले, असे भारत अरुण यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या