खुशखबर! देशातील कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

7917

देशात कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूला थोपवण्यासाठी देश-विदेशातील शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून लस शोधण्याचे काम करत आहेत. अशातच एक हुरूप वाढवणारी बातमी आली असून भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. सुरुवातीच्या चाचणीत ही लस पूर्णतः सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेली ही लस देशातील 12 शहरातील 375 स्वयंसेवकांना देण्यात आली होती. प्रत्येक स्वयंसेवकाला लसीची दोन डोस देण्यात आले होते. याचा त्यांच्या शरीरावर काय प्रभाव पडतो हे पाहण्यासाठी त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यादरम्यान ही लस सुरक्षित असून ज्या स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली त्यांच्यावर याचे कोणतेही साईडइफेक्ट जाणवले नाहीत, अशी माहिती पीजीआय रोहतक येथे सुरू असलेल्या चाचणीच्या टीम लीडर सविता वर्मा यांनी दिली.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी झाल्याने आता स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी करण्यात येत आहे. तत्पूर्वी त्यांच्या रक्ताचे नमुने जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जमा केलेल्या रक्ताच्या नमुन्याद्वारे लसीची इम्युनॉजेनिसिटीचा अभ्यास करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लय भारी! Zydus Cadila कंपनीनं कोरोनाचं देशातील स्वस्त औषध केलं लॉन्च, जाणून घ्या किंमत

लस सुरक्षित
ही लस सुरक्षित असून एम्समध्ये 16 स्वयंसेवकांवर याची चाचणी करण्यात आली, असे एम्सचे प्रमुख संजय रॉय यांनी सांगितले. एम्ससह देशातील 12 शहरात याची चाचणी करण्यात आली. महाराष्ट्रात देखील नागपूर आणि जळगाव येथे स्वयंसेवकांवर याची मानवी चाचणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या