
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाटय़ाचा पडदा अखेर गुरुवारी पडला. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असणाऱया आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या सत्तानाटय़ाच्या शेवटच्या अंकात भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाने बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळय़ात अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडत मास्टर स्ट्रोक मारला. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळय़ात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मविआ सत्तेतून बाहेर पडल्यावर आपल्याच सरकारविरोधात बंड पुकारणाऱया एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी राजभवन गाठले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन फडणवीस-शिंदे जोडीने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राजभवन येथेच पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला भाजपचा पाठिंबा असेल, आमचे लोक मंत्रिमंडळात असतील. मात्र या सरकारमध्ये आपण स्वतः सहभागी होणार नाही. सत्तेबाहेर राहून सरकारला मदत करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. त्यानंतर अर्ध्या तासातच दिल्लीतून चव्रे फिरली आणि सत्तेबाहेर राहणार असे म्हणणाऱया फडणवीस यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री व्हावं लागलं.
दिल्लीतून जे.पी. नड्डा यांनी केली फडणवीसांची घोषणा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक व्हिडीओ ट्विट करत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. फडणवीस यांनी सरकारपासून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला, पण भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्ये आले पाहिजे असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीमने फडणवीस यांनादेखील आग्रह केला आहे. केंद्रीय टीमने फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा असा आदेश दिला आहे, अशी माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी मोठय़ा मनाने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आमच्या नेत्याचे चरित्र दिसून येते. आम्हाला पदाची लालसा नाही हे यातून स्पष्ट होते, अशी पुष्टी नड्डा यांनी केली.
नड्डा यांच्यानंतर शहांचे ट्विट
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ट्विटपाठोपाठ गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठय़ा मनाने महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे अमित शहा यांनी जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले. फडणवीसांचा हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रति असणारी खरी निष्ठा आणि सेवेच्या समर्पणासाठी असणारी तयारी दर्शवते, असे ट्विट अमित शहा यांनी केले.
शपथ घेताना फडणवीसांच्या चेहऱयावर नाराजी
भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी फडणवीस हे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राजभवनात पोहोचले, मात्र त्यांच्या चेहऱयावरील नाराजी लपून राहिली नाही. आधी सरकारमध्ये सहभागी होणार नाही असे सांगणाऱया फडणवीस यांच्या चेहऱयावर प्रचंड तणाव आणि नाराजी दिसून येत होती. शपथविधीला उपस्थित असलेल्या अन्य भाजप नेत्यांकडूनही एपंदर याबाबत सांत्वन केल्याचीच भावना होती. शपथविधीनंतरही ते फार काळ थांबले नाहीत.
मोदींचा फडणवीसांना फोन
राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्रीपदावर आपली वर्णी लागेल अशी अपेक्षा फडणवीस यांना होती. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नसतानाही अनपेक्षितपणे अधिकची एक जागा निवडून आणल्याची बक्षिसी म्हणून मुख्यमंत्रीपदाची माळ फडणवीस यांच्या गळय़ात पडेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र केंद्रातील भाजपच्या नेत्यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यामुळे फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली; पण केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी फोनवरून फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
पन्नास आमदार आमच्यासोबत -एकनाथ शिंदे
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नावाची घोषणा करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला आहे. स्वतःचा पक्ष सर्वात मोठा असूनही त्यांनी स्वतःकडे पद न घेता ते मला दिले. इतक्या मोठय़ा मनाचा माणूस मी पाहिला नाही असे सांगतानाच एकनाथ शिंदे यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊनच आम्ही चाललो आहोत, असे सांगितले. या सगळय़ामागे आमच्यापैकी एकाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही. मी नगरविकासमंत्रीच होतो. शिवसेनेचे 39 आणि अपक्ष 11 असे एकूण 50 आमदार एकत्र आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजपचे धक्कातंत्र, फडणवीसांना कात्रजचा घाट!
‘मी पुन्हा येईन’, असे म्हणणाऱया भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेल्या अडीच वर्षांत जंगजंग पछाडले. त्यात त्यांना फारसे यश आले नाही. सरते शेवटी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना गळाला लावत मविआ सरकार पाडले आणि पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आपला मार्ग मोकळा केला. पण भाजपच्या दिल्लीतील चाणाक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत फडणवीस यांना कात्रजचा घाट दाखवत गपगुमान शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास भाग पाडले.
आधी मुख्यमंत्री नंतर मंत्री
- मुख्यमंत्रीपद भुषविल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद हे दोन नंबरचे पद भुषविणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच राजकारणी नव्हेत. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्याचा मंत्री होण्याचा असा प्रयोग अनेकदा रंगला आहे.
- 1975 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यावर शंकरराव चव्हाण हे 1978 मध्ये मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील पुलोद सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
- 1985 मध्ये शिवाजीराव पाटील-निलंगेकर मुख्यमंत्री होते, पण 2004 मध्ये त्यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये महसूलमंत्री व्हावे लागले.
- शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये 1999 ला मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये महसूल व उद्योगमंत्री होते.
- 2008 मध्ये अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भुषविले पण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
- 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी युती सरकारचे मुख्यमंत्री पद भुषवले पण आता ते उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
2 व 3 जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 2 व 3 जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असून याच अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही निवड करण्यात येणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना काढलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवरील निर्णय अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने आधीच्या आदेशांचे काय होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले. या दोघांनाही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा, अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
बाहेर थांबणारे फडणवीस आत कसे आले?
- भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्हिडिओ ट्विट केला आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली.
- लागलीच गृहमंत्री अमित शहा यांचेही फडणवीसांच्या अभिनंदनाचे ट्विट आले आणि पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोनवेळा फोन केला.
- मागच्या युती सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते तर शिंदे मंत्री. आता त्याच फडणवीसांना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे.






























































