किल्ले भास्करगड

कोणत्याही किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा मार्ग म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर हरिहरचा सुप्रसिद्ध किल्ला उभा राहतो. या किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमींची तुंबळ गर्दी असते. मात्र याच हरिहरसमोर एक किल्ला काहीसा दुर्लक्षित आहे, त्याचे नाव किल्ले भास्करगड ऊर्फ बसगड. हरिहरचा सोबती व हरिहर इतकाच देखणा असलेला हा दुर्लक्षित गड म्हणजे किल्ले भास्करगड ऊर्फ बसगड होय. हरिहरच्या पुढ्यात असणाऱ्या या गडाच्या पायऱ्या हरिहरच्या तुलनेत सरळ आकाशाला भिडणाऱ्या नसल्या तरी दुर्ग स्थापत्यदृष्टय़ा त्या हरिहरच्या तुलनेत तसूभरही कमी नाहीत. दोन्ही बाजूंना कातळ सरळ काटकोनात आसून दुर्गविशारदाने नागमोडी वळणाचा एक दगडी प्रशस्त जिनाच या गडावर निर्माण केला आहे.

डोळय़ांचे पारणे फिटावे असे कातळकोरीव काम या गडावर आपणास पाहावयास मिळते. किल्ले भास्करगडाला भेट देण्यासाठी आपणास पुणे-नाशिक-त्र्यंबकेश्वर-निरगुडपाडा-जांभुळपाडा असा प्रवास करावा लागतो. एक ते दीड तासाभराच्या दमछाकी नंतर जेव्हा आपणास भास्करगडाच्या कोरीव पायरी मार्गाचे दर्शन होते, तेव्हा नकळत इथवर आल्याचे समाधान मनाला वाटते. हजारो वर्षांपूर्वी कातळ कोरून घडवलेला हा पायरी मार्ग पाहून आपण थक्क होऊन जातो.

पुढे आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. हे प्रवेशद्वार पूर्वी निम्म्याहून अधिक दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते, पण दुर्गसंवर्धन करणाऱ्या मावळ्यांनी काही वर्षांपूर्वीच हा दरवाजा पूर्ववत मोकळा केला. गडप्रवेश केल्यावर सुरुवातीला वाटेत आपणास पाण्याची दोन टाकी दिसून येतात. ती पाहून पुढे गेल्यावर एकवाट उजवी कडे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. आपण आधी डावीकडे मोर्चा वळवायचा. थोड्या अंतरावर आपणास पाण्याची अजून एक-दोन टाकी दिसून येतात.

याव्यतिरिक्त या भागात कोणतेही दुर्गावशेष नाहीत. हरिहरगड, फणीचा डोंगर, त्र्यंबकगड, दुर्गभांडार, अंजनेरी किल्ल्याचे व वैतरणा नदी पात्राचे विहंगम दृश्य गडमाथ्यावरून न्याहाळता येते. हा नेत्रदीपक सोहळा डोळ्यांत साठवून आपण परत आल्या मार्गाने गडाचा सर्वोच्च माथा गाठायचा. या बाजूला वाटेत सुरुवातीला किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर वाटेत आपणास पाण्याचे एक कोरडे टाके दिसून येते.

गडाला प्रशस्त सपाट गडमाथा लाभला आहे. गडाला चौफेर सरळसोट कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण असल्याने दुर्गनिर्मिती करताना गडावर तटबंदी बांधण्याची गरज दुर्गविशारदांना भासली नाही. काळजाचे ठाव घेणारे उत्तुंग कातळकडे हे सह्याद्रीचे मुख्य वैशिष्टय़. हजारो वर्षांपूर्वी केवळ छन्नी हातोड्याच्या सहाय्याने अनामिक शिल्पकारांनी या कातळकड्यांशी लगट करून या सह्याद्रीत कित्येक दुर्ग उभारले. छन्नी हातोड्यांच्या घावातून साकारलेला किल्ले भास्करगड हा त्या दुर्गांपैकीच एक. किल्ले हरिहरप्रमाणेच दुर्गप्रेमी या गडाच्यासुद्धा पायऱ्यांच्या प्रेमात पडतील एवढे देखणे का तळकोरीव काम येथे आहे. मग कधी येताय किल्ले भास्करगडाच्या दर्शनाला …

भास्करगडावरील कातळकोरीव अवशेष पाहता या गडाची निर्मिती शिवपूर्वकाळात झाल्याचे स्पष्ट होते. 1670 च्या सुमारास मराठ्यांनी हरिहरसोबत या गडाचा ताबा घेतला. पुढे 1689 मध्ये मुघल सरदार मातब्बर खानाने त्र्यंबकगड, हरिहरसोबत भास्करगडसुद्धा जिंकून घेतला. 1776 मध्ये पेशवे या गडाचा वापर तुरुंग म्हणून करत असल्या ची नोंद आहे. पुढे 1818 मध्ये इतर गडांप्रमाणे भास्करगडही इंग्रजांनी जिंकून घेतला.

 डॉ . संग्राम इंदोरे, दुर्गदुर्गअभ्यासक