भातसा, तानसा ओव्हरफ्लो… जूनपर्यंतचा पाणी प्रश्न मिटला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असून आज भातसा आणि तानसा तलाव ओव्हरफ्लो झाले. यामुळे सातही तलावांत 1257442 दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला असून हे पाणी पुढील वर्षी जूनपर्यंत पुरणारे आहे. भातसा तलाव आज सकाळी 10 वाजता तर तानसा तलाव सायंकाळी 5.40 मिनिटांनी तुडुंब भरून वाहू लागला.

भातसा धरणाची पातळी 138.11 मीटर झाली असून तलाव क्षेत्रात संततधार सुरू आहे. यातच हवामान खात्याने पुढील 24 तासांत मुसळधार पडण्याचा अंदाज वर्तवल्याने धरणसाठा नियमित ठेवण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले. तर भातसा नदीच्या तिरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदीकाठावर वास्तव्य असणाऱया नागरिकांनी वाहत्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी. पवार यांनी केले आहे.