
चेंबूर सुभाष नगर येथील भाऊ प्रधान क्रीडांगणाचे सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. आधीच बांधकामामुळे या मैदानाच्या 20 ते 25 टक्के क्षेत्रात घट झाली आहे. त्यातच या ठिकाणी क्रिकेट टर्फ उभारण्याचा घाट घातला जातोय. येथे क्रिकेट टर्फ उभारल्यास स्थानिकांना खासकरून मुलांना मैदानाचा मुक्त वापर करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाऊ प्रधान क्रीडांगणातील क्रिकेट टर्फ, जिम्नॅशियम असे प्रकल्प रद्द करून या सार्वजनिक मैदानाचे संवर्धन करावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.
चेंबूर सुभाष नगरमधील 12,584 चौ.मी. जागेवर वसलेले भाऊ प्रधान क्रीडांगण हे म्हाडाच्या मालकीचे आहे. सुभाष नगर येथील बहुतांश रहिवासी मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातील असून मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळण्यासाठी हे मैदान महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानावर क्रीडा स्पर्धा, व्यायाम, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या खेळाचे सराव होत आहेत. आधीच या मैदानावर काही बांधकाम झाल्यामुळे मैदानाचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. त्यातच म्हाडामार्फत मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून क्रिकेट टर्फ उभारण्यात येत आहे. क्रिकेट टर्फ उभारल्यास मैदानाचा मुक्त वावर करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुभाष नगर राजेश्वरी हौसिंग सोसायटी, वैष्णव ग्रुप संस्था तसेच स्थानिकांनी या सुशोभीकरणाला विरोध दर्शवला आहे. याबाबत स्थानिकांनी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनादेखील निवेदन दिले आहे.
मैदानाचा व्यावसायिक वापर थांबवा
मैदानावर कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम, अतिक्रमण व व्यावसायिक वापरास परवानगी देऊ नये, क्रिकेट टर्फ तत्काळ काढून टाकावे, विविध खेळ आणि क्रीडा उपक्रमांसाठी मुलांना मैदान विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वैष्णव ग्रुप संस्थेचे सचिन ठाकूर यांनी केली.
























































