मिंध्यांच्या तीन खासदारांची उमेदवारी धोक्यात, नाराजांचा उद्रेक ‘वर्षा’वर धडक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी परस्पर जाहीर केलेली नाशिकमधील हेमंत गोडसे यांची उमेदवारी, यवतमाळमध्ये मिंधे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या नावाला भाजपकडून झालेला विरोध आणि हिंगोलीतील हेमंत पाटील यांच्या नावाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे केलेला विरोध यामुळे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण झालेला आहे. या तीनही विद्यमान खासदारांच्या नावांसाठी भाजप अनुकूल नाही. त्यामुळे या तिघांची उमेदवारी धोक्यात आलेली आहे.

यवतमाळ-वाशीममध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. कारण या मतदारसंघात शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी व संजय राठोड यांच्यात कमालीची स्पर्धा आहे. विद्यमान खासदार असूनही शिंदे गटाच्या पहिल्या यादीत भावना गवळी यांचे नाव जाहीर झालेले नाही. मध्यंतरी मिंधे गटाच्या या दोन नेत्यांमध्ये जाहीर वाद झाला होता. तुम्हाला या मतदारसंघातून लढायचं असेल तर लढवा. मग मात्र माझा दारव्हा-दिग्रस या विधानसभा मतदारसंघावर दावा राहील, असे आव्हान भावना गवळींनी दिले होते. संजय राठोड यांच्या नावाला भाजपचे नेते अनुकूल आहेत. महायुतीच्या उमेदवार म्हणून नाव जाहीर होत नसल्याने संतप्त झालेल्या भावना गवळी यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी धाव घेतली. या जागेचा तिढा कायम असल्याने संजय राठोड यांना तातडीने मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे.

नाशिकमध्ये बंडाचे निशाण

नाशिकमधील जागेचा तिढा निर्माण झाला याला खासदार श्रीकांत शिंदे कारणीभूत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची परस्पर घोषणा करून टाकली, पण तरीही पहिल्या यादीत हेमंत गोडसे यांचे नाव नसल्याने ते संतप्त झाले आहेत. दुसरीकडे नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप आग्रही आहे. हेमंत गोडसे यांनीही ‘वर्षा’ बंगल्यावर धाव घेतली, पण या जागेचा तिढा कायम आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इशारा हेमंत गोडसे यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.

हेमंत पाटील यांना हिंगोलीत विरोध

हिंगोली मतदारसंघातील शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून महायुतीत बेबनाव झाला आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. येथे शिंदे गटाची ताकद नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराचा फेरविचार करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपचे कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्यासाठी काम करण्याची शक्यता नाही. त्याचा फटका शिंदे गटाच्या या उमेदवाराला बसणार अशी चिन्हे आहेत.

– खासदार हेमंत गोडसे, भावना गवळी व हेमंत पाटील यांनी आज संध्याकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर धाव घेतली. या तिघांच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.