भवानी देवीची फ्रान्समध्ये विजयी पताका, तलवारबाजी स्पर्धेत मिळवले यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तलवारबाजी या खेळामध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत इतिहास रचणाऱया भवानी देवी या हिंदुस्थानच्या खेळाडूने फ्रान्समध्ये विजयी पताका फडकावली. भवानी देवी हिने महिलांच्या वैयक्तिक सेबर या प्रकारात तिने चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला.

28 वर्षीय भवानी देवी हिने फ्रान्समध्ये विजय संपादन केल्यानंतर ट्विटर या सोशल साइटवर प्रतिक्रिया व्यक्त केली. यामध्ये ती म्हणाली की, फ्रान्समधील स्पर्धा मला जिंकता आली. मोसमातील सुरुवात छान झालीय, असेही ती पुढे म्हणाली.

आता लक्ष्य आशियाई गेम्सवर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानी देवी हिने टय़ुनिशियाच्या नादिया बेन अझिझी हिला 15-3 अशा फरकाने हरवत पुढे पाऊल टाकले होते. मात्र त्यानंतर तिला फ्रान्सच्या मेनन ब्रुनेट हिच्याकडून हार सहन करावी लागली होती. फ्रान्सच्या याच खेळाडूने पुढे जाऊन कास्य पदक जिंकले होते. भवानी देवी हिंदुस्थानची सध्याची अव्वल फेन्सर असून जागतिक रँकिंगमध्ये ती 50व्या स्थानावर आहे. आता भवानी देवीला 2022 सालामध्ये होणाऱया आशियाई गेम्समध्ये पदक पटकावयाचे आहे. तिचे पुढील ध्येय हेच आहे.