भेंडी बाजारचा पुनर्विकास रखडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार पुनर्विकासाचा प्रकल्प लटकण्याची चिन्हे आहेत. विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सैफी बुऱ्हानी ट्रस्टच्या पुनर्विकास प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते तसेच चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेने ट्रस्टला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. काम थांबवले नाही तर ट्रस्टवर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.

दक्षिण मुंबईतील 16.5 एकरवर वसलेल्या भेंडी बाजाराचा सैफी बुऱ्हानी ट्रस्टकडून पुनर्विकास केला जाणार आहे. या परिसरात 250 जीर्ण इमारती असून 3 हजार 200 कुटुंबे तेथे राहतात तसेच 1 हजार 250 दुकाने या ठिकाणी असून मुंबईतील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पाच्या पुनर्विकासाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने तसेच चौकशीची मागणी लावून धरण्यात आल्याने पालिकेचे इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढोले यांनी शनिवारी सैफी बुऱ्हानी ट्रस्टला काम थांबवण्याची नोटीस बजावली. अधिवेशनातील पुनर्विकासाच्या प्रकल्पावर शंका उपस्थित करण्यात आल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे ढोले यांनी सांगितले तसेच ट्रस्टने नोटीसचे पालन न करता काम थांबवले नाही तर  मुंबई महानगरपालिका कायदा आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यांतर्गत ट्रस्टवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

25 हजार नागरिकांवर परिणाम 

पालिकेकडून आलेली नोटीस ही अनपेक्षित असून या नोटीसची दखल घेत काम थांबवण्यात आले आहे. या नोटीसमुळे भेंडी बाजारातील धोकादायक इमारतींत राहणाऱ्या 25 हजार नागरिकांवर परिणाम होणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने 600 हून अधिक कुटुंबांचे व 128 व्यावसायिक आस्थापनांना चांगले जीवनमान मिळाले आहे. उर्वरित भाडेकरूंचे लवकरात लवकर नवीन जागेत पुनर्वसन करण्यात येईल, असे सैफी बुऱ्हानी ट्रस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.