भिडेवाडा होणार आता राष्ट्रीय स्मारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

देशात मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ येथील भिडेवाड्यातून केली. तो भिडेवाडा राष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. या भव्य स्मृतिस्थळाबाबत पुणे महापालिका आणि पर्यटन, सांस्कृतिक विभागाला त्वरित कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

भिडेवाड्याची दुरवस्था झाली असून, या स्मारकाचे काम रेंगाळले आहे. हे स्मारक लवकरच पूर्ण करावे, अशी मागणी अनेकांनी केली आहे. याबाबत आमदार नागो गाणार यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. महापालिकेने २०१८-१९च्या अर्थसंकल्पात भिडेवाडा येथे दुरुस्ती करणे व स्मारक उभारणीसाठी १.०९ कोटी रुपयांची तरतूद केली असून, या स्मारकाचे काम प्राधान्याने करण्यासाठी महापालिकेला सूचनाही देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिली आहे.

भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. वाड्याची दुरुस्ती व स्मारकाची उभारणी करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुणे महापालिकेनेही त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली असून, या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे, असे बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एसटीपी प्रकल्प पूर्ण होण्यास २०२२ उजडणार
पुणे शहरातील मुळा-मुठा या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेतून ९९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हे प्रकल्प २०२२मध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तराद्वारे दिली. मुळा-मुठा नदीत सांडपाणी सोडले जाते आहे का? कचरा फेकला जात आहे का? असा लेखी प्रश्न आमदार जयदेव गायकवाड यांनी विचारला होता.

महापालिकेच्या हद्दीतून नदीत सांडपाणी सोडले जात आहे. पुण्यात रोज ७४४ एमएलडी सांडपाणी निर्माण होत असून, त्यापैकी ५६७ एमएलडीवर प्रक्रिया केली जात आहे. २०२७ पर्यंतच्या लोकसंख्या लक्षात घेऊन नदीसंवर्धन योजनेतून ९९०.२६ कोटी रुपये मंजूर केले असून, त्याद्वारे ११३ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यात ३९६ एमएलडी क्षमतेचे ११ शुद्धीकरण केंद्रे बांधले जाणार आहेत, हे काम २०२२ ला पूर्ण होणार असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

सायकल योजना दोन वर्षांत पूर्ण होणार – मुख्यमंत्री
ह पुण्यातील सायकल शेअिंरग योजना एकात्मिक सायकल आराखड्यानुसार सुरू झाली आहे. हा आराखडा तयार करताना शहराचे व्यापक सर्वेक्षण केले आहे. सायकल ट्रॅक विकसित करून त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. सायकल पाा\कगसाठी ७९८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी १५२ दाट वस्तीत आहेत. हा संपूर्ण आराखडा येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल, असे लेखी उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याबाबत आमदार अनिल भोसले यांनी प्रश्न विचारला होता.

‘कामधेनू दत्तक योजना’ योग्यप्रकारे राबवली नाही
दूध उत्पादन वाढवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने आणलेली योजना राज्य सरकारने स्वीकारली असून, राज्यात कामधेनू दत्तक योजना नावाने राबवण्यात येत आहे. पण, ही योजना योग्यप्रकारे राबवली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना चौकशी करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या कामधेनू दत्तक योजनेबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे लेखी उत्तरात जानकर यांनी नमूद केले.