भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण- गौतम नवलखा यांचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा कोरेगाव तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांचा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर नवलखा यांनी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. हायकोर्टाने याप्रकरणी आज एनआयएला नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

भीमा कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपण 90 दिवसापेक्षा जास्त दिवस तुरुंगात असून या कालावधीत तपास यंत्रणांनी आरोपपत्र दाखल करण्यास उशीर केल्याने आपण जामीनास पात्र असल्याचा दावा करत नवलखा यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला. सत्र न्यायालयाने 12 जुलै रोजी हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणाला (एनआयए) नोटीस बजावत 15 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले.