कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ, सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱयांची चौकशी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी निधीअभावी कामकाज गुंडाळण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निधी तत्काळ वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे आयोगासाठी सुविधा मागण्यास गेले असता आयोगाचे कामकाज थांबवण्याचा उपरोधिक सल्ला देणाऱया गृह विभागाच्या अधिकाऱयांची चौकशी केली जाणार आहे. कोरेगाव-भीमा आयोगाची मुदत 8 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असताना आयोगाला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती गृहमत्र्यांनी दिली.

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाची शुक्रवारची सुनावणी संपल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी आयोगातील कर्मचाऱयांचे मानधन, त्याचप्रमाणे मागण्यात आलेल्या 65 लाख निधीपैकी 25 लाखच निधी उपलब्ध झाल्याचे स्पष्ट केले होते. सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने कामकाज गुंडाळत असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज तातडीने दखल घेऊन आयोगाला दोन महिन्यांची मुदतवाढ देतानाच आयोगाची असलेली थकबाकी आजच तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत, तर जे पोलीस आयोगाला सहकार्य करणार नाहीत त्यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) श्रीकांत सिंह यांच्यामार्फत चौकशी करण्याचे निर्देशही आज देशमुख यांनी दिले.