
भिंगार कॅम्प पोलिसांच्या व्हॅनमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पोक्सोच्या गुह्यातील आरोपीचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणात चौकशी अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली आहे.
सादिक बिराजदार याच्यावर भिंगार पोलिसांत बाललैंगिक अत्याचाराचा (पोक्सो) गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असलेल्या सादिकला दीड महिन्यांनंतर पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. यानंतर पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाल्याजवळ सादिकने पोलिसांच्या व्हॅनमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सादिकची पत्नी रुक्सार हिने भिंगार कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली असून, पोक्सोच्या फिर्यादींनी पोलिसांच्या व्हॅनमधून काढून सादिकला मारहाण केल्याचे त्यात म्हटले असून, याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, भिंगार पोलिसांनीही सादिकवर पळून जाण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, नगरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱयांच्या समोर पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सादिकच्या घराजवळ मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी चौकशी अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. सादिकच्या कुटुंबाने पोलीस संरक्षणाची मागणी केली असेल, तर त्यांना ते देण्यात येईल. पोलीस कस्टडीत एखाद्याचा मृत्यू झाल्यास वरिष्ठांना, सीआयडीला आणि मानवाधिकार संरक्षण विभागाला अहवाल द्यावा लागतो, त्यानुसार आम्ही हा अहवाल त्यांच्याकडे सादर केलेला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पंचनामा करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत 40हून अधिक जणांचे जबाब घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
एखादा आरोपी ताब्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यासंदर्भातील सर्व नियम आखून दिलेले असतात; तसेच सर्वोच्च न्यायालयानेही या संदर्भामध्ये काही आदेश दिलेले आहेत. या प्रकरणात सर्व बाबींचा विचार करूनच अहवाल आल्यानंतर उचित कारवाई केली जाईल, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
































































