
भिवंडीतील ‘जिलानी’ इमारत कोसळून 40 जणांचे बळी गेल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटत नाहीत तोच आज भरदुपारी 12.30 वाजता वलपाडा येथील तीन मजली वर्धमान इमारत पत्त्यासारखी कोसळली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या भीषण दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले, तर नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मृतांमध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. ढिगाऱयाखाली अजूनही 30 जण दबल्याची भीती व्यक्त होत असून विविध पथकांचे रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
अडीच वर्षांचा शिवकुमार आईसह, ढिगाऱयाखालून जिवंत परतला
तिसऱया मजल्याच्या ढिगाऱयात सोनाली आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा शिवकुमार दबला. परंतु सोनाली यांनी उजेड दिसेल त्या बाजूने ढिगारा बाजूला सारत रस्ता बनवला आणि त्यातून इंच इंच सरकायला सुरुवात केली. अखेर दोघेही मायलेक मृत्यूच्या दाढेतून परतले.





























































