भिवंडीतील टावरे क्रीडांगणात गर्दुल्ल्यांची ट्वेंटी ट्वेंटी…

भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परशुराम टावरे स्टेडियममध्ये गर्दुल्ल्यांची ट्वेंटी ट्वेंटी सुरू आहे. गर्दुल्ले आणि गांजाडी क्रीडांगणात येतात, १५ ते २० मिनिटे थांबतात आणि निघून जातात. भोईवाडा पोलिसांनी स्टेडियममध्ये धाड टाकली असता तीन लुम कामगार गांजा पिताना आढळले. चरसी, दारुडे आणि गर्दुल्ल्यांचा जणू काही हा अड्डाच बनला आहे. त्यामुळे स्टेडियमवर रनिंग आणि व्यायामासाठी येणाऱ्या तरुणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

टावरे स्टेडियम हे शहराच्या मध्यभागी असल्याने दारुडे आणि गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. रोज सकाळी नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या स्टेडियमवर येतात. मात्र त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. संध्याकाळ झाली की स्टेडियममध्ये दारुड्यांच्या टोळ्या कोफ्ऱ्यामध्ये येऊन बसतात. दारू पिऊन झाल्यानंतर दारुडे रिकाम्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे स्टेडियममध्येच सोडून देतात. याची गंभीर दखल घेऊन भोईवाडा पोलीस पथकाने स्टेडियममध्ये धाड टाकली. त्यावेळी शहजाद शेख, संनाउल्लाह अन्सारी आणि अनिल दुधनाथराम हे तिघे जण गांजा ओढताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत नोटीस देऊन सोडून दिले

आओ जाओ घर तुम्हारा…
सुरक्षारक्षक नसल्यामुळे स्टेडियम परिसरात आओ जाओ घर तुम्हारा.. अशी परिस्थिती झाली आहे. तर येथील बैठक व्यवस्थेचा वापर लुम कामगार झोपण्यासाठी करतात. पालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे स्टेडियममध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छता आणि घाणीच्या त्रासाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे