13 वर्षांनी पुन्हा उघडणार ‘त्या’ रहस्यमयी राजवाड्यातला दरवाजा!

‘एक रहस्यमयी राजवाडा.. त्याचा रक्तरंजित भूतकाळ आणि एक दरवाजा.. जो 13 वर्षांपासून बंद होता. तो आता पुन्हा उघडणार आहे. त्या दरवाजामागे नेमकं काय रहस्य आहे, तेही सर्वांना कळणार आहे. पण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल..’ हे वर्णन एखाद्या गूढरम्य कादंबरीतलं किंवा एखाद्या झपाटलेल्या जागेविषयी वाटतं. हो ना? पण इथे थोडी गोम आहे. कारण हे वर्णन एका आगामी चित्रपटाचं आहे. त्या चित्रपटाचं नाव अर्थातच भुलभुलैय्या 2.

13 वर्षांपूर्वी भुलभुलैय्या नावाचा विनोदाची झालर असलेला एक धमाल रहस्यपट प्रदर्शित झाला होता. एका राजवाड्यातल्या एक गूढ बंद दरवाजा, त्याचं रहस्य आणि त्याची उकल अशी त्याची कथा होती. अक्षय कुमार, शायनी आहुजा, विद्या बालन, अमिषा पटेल, परेश रावल यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याचा सिक्वल आता येऊ घातला असून या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची काही पोस्टर्स सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या पोस्टरवर भगव्या कपड्यात कार्तिक आर्यन दिसतोय. त्याचा अवतार हुबेहुब पहिल्या चित्रपटातल्या अक्षयच्या व्यक्तिरेखेसारखा दिसतोय.

या चित्रपटात नेमकं काय रहस्य उलगडणार आहे तसंच कार्तिकसोबत कोणकोणते कलाकार असणार आहेत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अनिस बझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून भूषण कुमार यांची निर्मिती असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या