
सामना ऑनलाईन। भोपाळ
खराब हवामानामुळे जर विमान रडारवर दिसत नाहीत. तर मग पाऊस पडल्यावर ही विमान गायब होतील का, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी आकाशात असलेल्या ढगांमुळे हिंदुस्थानी वायुदलाची विमाने पाकिस्तानला रडारवर दिसली नाहीत, असे मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. हे वक्तव्य चांगलेच गाजत असून राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश येथील प्रचारसभेत बोलताना यावरून मोदींना लक्ष्य केले. मोदीजी, तुमचे वक्तव्य प्रमाण मानायचे झाले तर पावसाळय़ात सगळी विमानेच रडारवरून गायब होतील का, असा खोचक सवाल केला आहे.
देशातील बेरोजगारीचे काय?
अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत तुम्ही आंबा कसा खायचा हे सांगितले. कुर्ता कसा घालायचा हे शिकवण्याचा प्रयत्नही केलात, मात्र बेरोजगारीचे काय? देशातील बेरोजगार युवकांसाठी काय करणार हेदेखील सांगावे. वर्षाला दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले याचे उत्तर द्या, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
वायुसेनेच्या अधिकाऱयांना मूर्ख समजता का? – मणिशंकर अय्यर
पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगांचा आसरा घेण्याचा हिंदुस्थानी वायुसेनेला सल्ला दिला होता हे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. अशा प्रकारे अवैज्ञानिक दावे करताना मोदी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱयांना मूर्ख समजतात का? पंतप्रधानांची चूकही सुधारता न येण्याइतके अधिकारी भित्रे आहेत का, असे प्रश्न काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘रायझिंग कश्मीर’ या वृत्तपत्रातील लेखातून केले आहेत.
पंतप्रधानांनी स्वतःच आपला स्तर खालावला – सुरजेवाल
एखाद्याबद्दल मनात द्वेष, राग ठेवणे तसेच शिव्या देणे ही भाजपची प्रमुख अस्त्र आहेत. पंतप्रधान मोदी हे व्यक्तिगत आरोप करण्यात इतके गुंतलेत की, ते ज्या पदावर आहेत त्या पदाची प्रतिष्ठा त्यांनी धुळीला मिळवली असून पंतप्रधानांनी स्वतःच आपला स्तर खालावला आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाल यांनी केली आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. पंतप्रधानांबद्दल खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱयांचे कधीच समर्थन केले जाणार नाही. अय्यर यांच्या वक्तव्याची योग्य ती दखल घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


























































