भोसरी जमीन घोटाळा, मंदाकिनी खडसेंना तूर्तास अटक नाही

भोसरी येथील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलासा दिला आहे. मंदाकिनी यांना या प्रकरणात तूर्तास अटक करू नये असे आदेश न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी ईडीला (अंमलबजावणी संचालनालय) दिले आहेत. तसेच मंदाकिनी यांनी ईडीला सहकार्य करावे यासाठी 7 डिसेंबरपर्यंत आठवडय़ातून दोनवेळा ईडी कार्यालयात हजर रहावे अशा सूचना दिल्या आहेत.

भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केले असून या सर्वांवर मनी लॉण्डरिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच विशेष न्यायालयात खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्याने पीएमएलए कोर्टाने मंदाकिनी यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. याप्रकरणी अटक होऊ नये यासाठी मंदाकिनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारले की, तुम्ही तपास यंत्रणांना सहकार्य का करत नाहीत? त्यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले की, ईडी तपासादरम्यान आपल्या अशिलाविरोधात कारवाई करू शकते. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, याचिकाकर्त्यांना अटक झाल्यास 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात यावी.