
माढय़ाची उमेदवारी जाहीर केल्याने आणि सातारची उमेदवारी जाहीर न केल्याने भाजपची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. माढय़ाचा उमेदवार बदलण्यासाठी महायुतीतूनच प्रचंड दबाव तयार झाला आहे, तर साताऱयाची जागा कुणाकडे, इथेच घोडे अडल्यामुळे भाजपपुढे बाका प्रसंग तयार झाला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगायला लागले आहे. मार्च उजाडल्यापासून सर्वांचे लक्ष उमेदवार याद्यांकडे लागले होते. अशात भाजपच्या दुसऱया यादीत माढय़ातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली, तर सातारचा निर्णय अधांतरी ठेवला. यामुळे भाजपमध्येच जोरदार बेदिली माजली आहे. माढय़ाच्या उमेदवारीला पहिल्या घटकेपासूनच आणि तेही महायुतीतूनच प्रखर विरोध सुरू झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली. ज्या विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गेल्यावेळी रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरसमधून लाखाचे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, त्याच मोहिते गटाने उघडपणे बंडाचे निशाण फडकावत निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही निंबाळकरांना जोरदार विरोध असून, तशी उघड भूमिका त्यांनी मांडली आहे.
मोहिते-पाटील, रामराजे यांच्या कडव्या विरोधामुळे उमेदवारी जाहीर करून बसलेल्या भाजपचे तोंड पोळले आहे. या स्थितीत माढय़ाची जागा अडचणीत तर आली आहे; पण कोणाच्याही दबावापुढे झुकायचे नाही, अशी भाजपची मानसिकता असल्याचे संकेत मिळत आहेत. गिरीश महाजन यांनी अकलूज, सातारला धाव घेऊन आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊनही माढा आणि सातारचा तिढा सुटण्याऐवजी आणखी घट्ट झाला आहे. त्यामुळेच भाजपची मोठी कोंडी झाली आहे.
अजित पवार गटाकडे माढय़ाची जागा जाण्याचे संकेत
कालपासूनच माढा आणि सातारच्या अनुषंगाने घडामोडी घडल्याचे दिसून आले. सातारच्या उमेदवारीसंदर्भात काल उदयनराजे यांनी मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते फडणवीस यांच्यासह दिल्लीला शहा यांच्या भेटीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. तसेच माढय़ाबाबतच्या दुसऱया बैठकीत रामराजे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून कळवतो, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आज फलटणमध्ये रामराजे यांच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा झाला. या घडामोडी होत असतानाच आज सोशल मीडियावर महायुतीत सातारा आणि माढय़ाच्या जागांची अदलाबदल झाल्याचे व्हायरल होत आहे. सातारची जागा भाजपकडे, तर माढय़ाची जागा अजित पवार गटाकडे देण्यात आल्याचे संदेश व्हायरल होत होते. त्यामुळे ‘उदयनराजे फिक्स’, तर माढय़ात रणजितसिंह निंबाळकर यांचा पत्ता कट’ अशी जोरदार चर्चा सुरू होती.
‘तुतारी’ घेऊन मैदानात उतरा !
या पार्श्वभूमीवर आज फलटणमध्ये रामराजे समर्थकांचा जाहीर मेळावा झाला. त्यात माढा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. त्याचप्रमाणे रामराजे यांचे बंधू संजीवराजे यांनी ‘तुतारी’ घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरावे, अशी जोरदार मागणी रामराजे यांच्यासमोरच करण्यात आली. त्यावर सभागृहात एकच जल्लोष झालेला पाहायला मिळाला.
फिक्स आहे, तर जाहीर का नाही?
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभोसाठी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी त्यांनाच मिळेल, असे समर्थकांनी गृहीत धरले असताना दुसऱया यादीतही नाव न आल्याने उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांची उमेदवारी फिक्स आहे, असे भाजपचे नेते सांगतात, मग उमेदवारी का जाहीर होत नाही, असा सवाल उदयनराजे समर्थकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी वेगळी भूमिका घेतल्यास भाजपची कोंडी वाढेल.





























































