सामना ऑनलाईन । पालघर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी पालघर जिह्यात झंझावाती दौरा केला. दुपारी साडेअकरा वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चाललेल्या संवाद-संपर्क यात्रेला या भागातील जनतेने त्यांना तुफान प्रतिसाद दिला. संपर्क यात्रेच्या मार्गावर नाक्या-नाक्यांवर शिवसेनेच्या मावळ्यांनी प्रचंड गर्दी करत उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत केले.
“शिवसेना-भाजप युती तुटावी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीवाले देव पाण्यात बुडवून बसले होते. आता या निवडणुकीत त्यांना बुडवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. केवळ पालघर किंवा राज्यातच नव्हे तर संसदेवर पुन्हा एकदा भगवा फडकणारच”, असा जबरदस्त विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. वरई-सफाळे मार्गावर नावझे येथे उध्दव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसोबत संवाद राधला. यावेळी कुडे, हालोली, दहिसर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव, तांदुळवाडीसह पंचक्रोशीतील शिवसेना कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालघर जिल्हा संघटक श्रीनिवास वनगा, युतीचे उमेदवार राजेंद्र गावीत, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, महिला विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, यांच्यासह पालघर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




























































