इराणवर सर्वात मोठा हल्ला अद्याप बाकी, अमेरिकेची पूर्ण ताकद अजून वापरलीच नाही; ट्रम्प यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतचा सर्वात भीषण इशारा दिला आहे. इराणवर अद्याप सर्वात मोठा हल्ला होणे बाकी आहे, असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी येणाऱ्या काळात युद्धाची तीव्रता प्रचंड वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सीएनएनला (CNN) दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने अद्याप आपली पूर्ण लष्करी ताकद वापरलेली नाही. “येणाऱ्या दिवसांत ही लष्करी कारवाई अधिक वेगवान आणि आक्रमक होईल. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आहे आणि आम्ही आता त्याचा पूर्ण ताकदीने वापर करत आहोत,” असे ट्रम्प यांनी सांगितले.

ब्रिटनवर व्यक्त केली तीव्र नाराजी

या युद्धाच्या धामधुमीत ट्रम्प यांनी आपला जुना मित्र देश असलेल्या ब्रिटनवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी हिंदी महासागरातील आपला लष्करी तळ डिएगो गॉर्सिया (Diego Garcia) अमेरिकेला वापरण्यासाठी देण्यास उशीर केल्याने ट्रम्प संतापले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका या तळावरून इराणवर हल्ला करू इच्छित होती. मात्र, ब्रिटनने याला परवानगी देण्यास ४८ तासांचा विलंब लावला. इतकेच नाही तर, या तळावरून केवळ इराणच्या क्षेपणास्त्र तळांनाच लक्ष्य करण्याची अट ब्रिटनने घातली आहे. ब्रिटनच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या युद्ध रणनीतीमध्ये अडथळा निर्माण झाला असून, “मी ब्रिटीश पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे अत्यंत निराश आहे,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.