
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, दिवाळीनंतर 6 नोव्हेंबर व 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत बिहारमध्ये मतदान होणार असून निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी ही घोषणा केली. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक माहितीही त्यांनी यावेळी दिली. बिहारची निवडणूक पारदर्शी पद्धतीने व शांततेत पार पडेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
14 लाख नवे मतदार
सुधारित मतदारयादीनुसार, बिहारमध्ये एकूण 7.43 कोटी मतदार आहेत. त्यात 3.92 कोटी पुरुष तर 3.50 कोटी महिला मतदार आहेत. यात 4 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. 14.1 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरस
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. मुख्य लढत एनडीए व महागठबंधनमध्ये होणार आहे. एनडीएमध्ये सध्याचे सत्ताधारी भाजप व संयुक्त जनता दलाचा समावेश आहे. तर महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. त्याशिवाय चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष आणि प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही मैदानात आहे.