
सामना ऑनलाईन । पाटणा
मुसळधार पावसामुळे ठरलेले लग्न मोडू नये म्हणून एका वाग्दत्त वधूने बोटीने प्रवास केला आहे. या वधूच्या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून तिच्या सासरची मंडळीही तिच्यावर प्रचंड खूष झाली आहेत.
बिहारमधील निमा गावातील सुनिता तुडू हिचे झारखंडमधील मरो गावातील मानवेल मरांडीसोबत ६ जुलै रोजी लग्न होणार होते. लग्न मुली राहत असलेल्या गावात आयोजित करण्यात आले होते. मात्र तिथे येण्यासाठी फक्त बोटीने नदी पार करून येण्याचा एकमेव मार्ग होता. मात्र मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता व त्यामुळे सासरच्या मंडळीने आम्ही लग्नाला येऊ शकत नाही असे कळविले. तसेच त्यांनी थेट लग्न मोडत असल्याचाच निरोप धाडला. लग्न मोडल्याचा निरोप आल्यामुळे वधूकडील मंडळी प्रचंड नाराज झाली होती. त्यांनी वरमंडळींना समजवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी जर तुम्ही नदी पार करून इथे आलात तर लग्न होईल असे आश्वासन दिले.

इतक्या इतक्या नातेवाईकांना घेऊन नदी पार करने धोक्याचे असल्याने वधूकडील मंडळींनी देखील लग्न मोडल्याचे मान्य केले. मात्र दोन्हीकडच्या मंडळींचा हा निर्णय मान्य नसलेल्या वधूने स्वत: बोटीने नदी पार करण्याचे ठरवले. तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाला विरोध केला मात्र मुलीच्या हट्टापुढे त्यांचेही चालले नाही. अखेर घरातील काही मंडळी बोटीने झारखंडला गेली व धुमधडाक्यात मुलीचे लग्न पार पडले.
























































