Bihar election – जागावाटपाचं ठरलं! जदयू 122, तर भाजप 121 जागांवर लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जनता दल (युनायटेड) 122, तर भारतीय जनता पक्ष 121 जागांवर लढणार आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जागावाटपाची घोषणा केली. नितीश कुमार यांनी एनडीए स्वबळावर निवडणूक लढेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, जदयू आपल्या कोट्यातून जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाला 7 जागा देईल. जदयू स्वतः 115 जागांवर उमेदवार देईल. तर भाजप आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून काही जागा मुकेश सहनी यांच्या विकासशील इंसान पार्टीला देईल.

नितीश कुमारच मुख्यमंत्री
दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच लोजपा एनडीएतून लढणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रामविलास पासवान यांची तब्येत चांगली असती तर अशी परिस्थिती उत्पन्न झाली नसती, असे सुशील मोदी म्हणाले. तसेच आवश्यकता पडल्यास एनडीए अंतर्गत लढणारे फक्त 4 पक्षच पंतप्रधान मोदी यांचा फोटो प्रचाराला वापरू शकतील, अन्य कोणत्याही पक्षाला त्यांच्या फोटोचा वापर करण्याचा अधिकार नसल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल, असे सुशील मोदी यांनी सांगितले.

2010 ला लढले होते एकत्र
याआधी भाजप आणि जदयू 2010 ला एकत्र लढले होते. त्यावेळी जदयूने 141 तर भाजपने 102 जागांवर उमेदवार दिले होते. निवडणुकीत जदयू 115 तर भाजप 91 जागांवर विजयी झाली होती.

तीन टप्प्यात निवडणूक
बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 28 ऑक्टोबरला 71 जागांसाठी, 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी आणि 7 नोव्हेंबरला 78 जागांसाठी मतदान होईल. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.