कोरोना… शेतकरी… जीएसटीची ऐसी की तैसी! बिहार निवडणुकीचा बिगुल, 10 नोव्हेंबरला निकाल

कोरानाचा वाढलेला संसर्ग, कृषी विधेयकाविरोधात शेतकऱयांनी सुरू केलेले आंदोलन, स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न आणि जीएसटीची ऐसी की तैसी झाल्यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी या अभुतपूर्व परिस्थितीत बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला असे तीन टप्प्यात मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. कोरोना काळात होणारी जगातील सर्वात मोठी निवडणूक असे वर्णन निवडणूक आयोगाने केले आहे. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन केले जाईल असेही आयोगाने सांगितले.

बिहार विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबरला संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांचीही माहिती दिली.

243 मतदारसंघात निवडणूक, 7.29 कोटी मतदार.

एक लाखावर मतदार केंद्रे. प्रत्येक मतदार केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदार.

पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 69 मतदारसंघात मतदान.

दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला. 94 मतदारसंघात मतदान.

तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला. 78 मतदारसंघात मतदान.

10 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकाल.

अर्ज दाखल करताना दोघेच; बटण दाबताना हँड ग्लोव्हज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार आणि आणखी एकजण अशी दोघांनाच परवानगी.

अनामत रक्कम आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन सुविधा. प्रचारात रोड शोसाठी फक्त पाच वाहने. सभांवेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन.

ऑनलाइन सभांवर भर

मतदानावेळी निवडणूक कर्मचारी, पोलिसांसाठी 23 लाख हँड ग्लोव्हज. 7 लाख सॅनिटायझर, 46 लाख मास्क, 7.70 लाख फेसशिल्ड, 6 लाख पीपीई किट.

मतदान केंद्रावर सॅनिटायझर, इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनवर बटण दाबण्यासाठी मतदारांना 7.2 कोटी हँडग्लोज.

 निवडणूक चुरशीची होणार

2015 च्या विधानसभा निवडणुकीत लालुप्रसाद यादव यांच्या राजद आणि नितिशकुमार यांच्या जदयु व काँग्रेस पक्षांचे महागठबंधन होते. राजदला सर्वाधिक 80 जागा मिळाल्या. जदयुला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या.

भाजपने रामविलास पासवान यांच्या लोजपासह राष्ट्रीय  लोक समता पार्टी आणि हिंदुस्थान अवामी मोर्चाबरोबर युती केली होती. या युतीला 58 जागा मिळाल्या. भाजपला 53  जागा मिळाल्या होत्या.

2015 ला महागठबंधनचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी तिसऱयांदा शपथ घेतली. मात्र, दोन वर्षात महागठबंधन सोडून नितीशकुमार यांनी भाजपबरोबर सरकार बनविले.

यावेळी संदर्भ बदलले आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवीत आहे. राजदची सूत्रे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्याकडे आहेत. कोरोनाच्या काळात होणारी ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.  

कोरोना रुग्णही करणार मतदान

मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली असून या शेवटच्या तासात कोरोना रुग्णही मतदान करू शकतात असे आयोगाने सांगितले.कोरोनामुळे जगभरातील 70 हून अधिक देशांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र कोरोना लवकर नष्ट होईल असे काही वाटत नाही. म्हणूनच जनतेचा लोकशाहीचा अधिकार जपला गेला पाहिजे, असे आम्हाला वाटते, असे आयुक्त अरोरा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या