
सामना ऑनलाईन। पाटणा
पाणी पुरी आवडत नाही अशी व्यक्ती विरळीच असेल. टपोरी पुरी आणि त्यातलं तिखट पाणी ही खरी पाणी पुरी खाण्याची मजा. पण बिहारमध्ये पाणी पुरीचा आस्वाद घेताना दुकानदाराने चलाखी करत एक पुरी कमी दिली. यामुळे चिडलेल्या तरुण ग्राहकाने त्याला धू धू धुतले आणि त्याचे डोके फोडले. यावेळी या दोघांना आवरण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांनाही या दोघांनी चोपले. यात अनेकजण जखमी झाले आहेत
.
बेगूसराय येथील जी डी कॉलेजजवळ एक प्रसिद्ध पाणीपुरीवाला आहे. या दुकानातील पाणीपुरी खाण्यासाठी रोज ग्राहकांच्या रांगा लागतात. शुक्रवारीही अशीच गर्दी त्याच्या दुकानाबाहेर झाली होती. यावेळी एक 23 वर्षांय तरुण तेथे पाणीपुरी खाण्यासाठी आला. पण गर्दी असल्याने त्याला पाणीपुरी देण्यास दुकानदाराला वेळ लागला. त्यातच तो तरुणासह इतरांना लवकर पाणीपुरी खा .पुढे जा. असे सतत सांगत होता. त्याच गडबडीत दुकानदाराने 20 रुपयात सहाऐवजी पाचच पुऱ्या दिल्या. त्यामुळे पाणीपुरीचा आस्वाद घेणाऱ्या तरुणाची सटकली. पैसे घेतलेस आणि पुरी कमी का दिली असा जाब त्याने दुकानदाराला विचारला.
यामुळे दुकानदार चिडला. आपण बरोबर सहा पुऱ्या दिल्या असे त्याने तरुणाला सांगितले. पण तरुण ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी दोघांमध्ये हा वाद इतका चिघळला की त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या लोकांनाही दुकानदारने मारले. शेवटी तरुणाचा संतापाचा पारा वाढला आणि त्याने बाजूलाच पडलेला बांबू दुकानदाराच्या डोक्यात घातला. हे बघताच लोकांनी तरुणाकडे धाव घेत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण चिडलेल्या तरुणाने त्यांनाच चोपण्यास सुरुवात केली. यात अनेकजण जखमी झाले आहेत. शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेत तरुणाला तुरुंगात टाकले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.




























































