
कोरोना लसीकरणाबद्दल सतत जागरूकता निर्माण केली जात असताना दुसरीकडे मात्र हलगर्जीपणा होताना दिसत असल्याच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार बिहारच्या सारण जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका परिचारिकेने कोरोनाची लस न भरताच एका तरुणाला इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बिहारच्या सारण येथील ही घटना आहे. परिचारिकाने त्या इंजेक्शनमध्ये कोरोनाची लस न भरता अझर नावाच्या तरुणावर रिकामी सुई ठेवली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक परिचारीका सिरिंजचे रॅपर फाडताना दिसत आहे. यानंतर, ती सिरिंजमधून कोविड लस न भरता इंजेक्शन देत आहे. मात्र जेव्हा ती परिचारिका तरुणाला लस देत होती. त्यावेळी त्याच्या मित्राने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला होता. मात्र तोपर्यंत संबंधित तरुण आणि त्याच्या मित्राला या लसीविषयी काही माहिती नव्हते. या प्रकरणात सारणचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओबद्दल माहिती मिळाली आहे. परिचारिका चंदा कुमारी हिच्यावर कारवाई केली, मात्र या प्रकरणाला अनावधानाने झाल्याचे बोलले जात आहे. तथापि, या प्रकरणात चूक होण्याची शक्यता देखील आहे.
जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्या परिचारिकेने जाणिवपूर्वक केले नाही. गर्दी खूप मोठी होती. हे तिच्याकडून चुकून झाले आहे. त्या तरुणाला त्याच्या पहिल्या डोससाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या तरुणाला त्याच्या इच्छेनुसार नवीन तारीख निवडण्यास सांगितले आहे. याबाबत अझरने जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांच्या मुद्याचा पुनरुच्चार देखील केला. तो म्हणाला की परिचारीकेने रिकामी सिरिंज चुकून लावली आहे. त्यांना क्षमा करण्याबद्दलही तो बोलला. या संपूर्ण प्रकरणात चूक झाल्याचे प्रशासन सांगत असले तरी ही प्रक्रिया कोरोना लसीकरणावर प्रश्न उपस्थित करणारी आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार केला नसता तर त्या युवकाला कोरोना लस मिळालेली नाही हे कधीच कळले नसते.
























































