पत्नी, मेहुणीची हत्या करून जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका लष्करातील जवानाने पत्नी व मेहुणीची गोळ्या झाडून हत्या केली व नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विष्णु शर्मा (35), दामिनी (32) आणि खुशबू  (22) अशी मृतांची नावे होती. ही घटना रविवारी सकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील राहणारे विष्णु शर्मा हे सैन्यात असून ते गुजरातमध्ये तैनात होते. त्यांना डेंग्यूचा आजार झाल्याने ते उपचारासाठी घरी परतले होते. रविवारी ते आपली पत्नी दामिनी, मेहुणी खुशबू आणि दोन लहान मुलांसह बलेनो गाडीने पाटणा येथे रुग्णालयात गेले होते. गाडीचे ड्रायव्हर मिथिलेश ठाकूर यांनी सांगितल्यानुसार, रुग्णालयातून घरी परतताना प्रवासादरम्यान विष्णु शर्मा यांचे त्यांची पत्नी आणि मेहुणीशी भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की त्यांनी रागाच्या भरात आपल्याकडील परवाना असलेली बंदुक काढून गोळीबार सुरू केला. त्यांनी मेहुणी आणि पत्नीवर गोळीबार केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

अचानक झालेल्या गोळीबारानंतर ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि आरडाओरड सुरू केली. ड्रायव्हरचा आरडाओरडा ऐकून जमलेल्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेत दोन्ही लहान मुले सुरक्षित आहेत. पोलीस याप्रकरणी ड्रायव्हरची चौकशी करत आहेत.