
बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात मोठा तमाशा झाला. लग्नासाठी वधूच्या घरी गेलेल्या नवरदेवाच्या प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले आणि नंतर नववधूच्या जागी तिच्या बहिणीशी लग्न करावं लागलं. कहर म्हणजे त्याची प्रेमिका दुसरी तिसरी कोणी नसून वधूची बहिणच निघाली. अखेर दोन्ही कुटुंबाने त्या दोघांचे लग्न लावून दिले.
ही घटना सारण जिल्ह्यातील भभौली गावातील आहे. गावातील रामू बीन यांची मुलगी रिंकू कुमारीचे लग्न छपरा शहरातील रतनपुरा बिनटोली येथीस जगमोहन महतो यांचा मुलगा राजेश कुमार यांच्याशी 2 मे रोजी ठरले होते. 2 मे रोजी नवरदेव बॅण्ड-बाजाची वरात घेऊन रिंकू कुमारी हिच्या घरी पोहोचला. वधूच्या घरच्यांनी त्यांचे स्वागत केले आणि लग्नाचे विधी सुरू झाले. द्वारपूजेनंतर स्टेजवर रिंकू आणि राजेशने एकमेकांना हार घातले. मात्र लग्नात ट्विस्ट आला. जेव्हा वधूची बहिण पुतुल कुमारीने राजेशला फोन केला आणि त्याने तिच्या बहिणीशी लग्न केले तर ती छतावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या नवरदेवाने त्याच्या घरच्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. दोन्ही पक्षांमध्ये सुरूवातीला शाब्दीक वाद झाला मात्र त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच ते घटनास्थळी पोहोचले. दोन्ही कुटुंबियांकडून सगळी माहिती घेतली आणि पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजवले. त्यानंतर कुटुंबियांनी राजेशचे लग्न रिंकूची बहिण पुतुलशी लावून दिले आणि तिची पाठवणी केली.
पुतुल कुमारी आणि राजेश एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. मात्र राजेशचे लग्न पुतूलची बहिण रिंकूशी ठरले होते. 2 मे ला दोघांचे लग्न होते. पुतुलची इंटरमीडिएटची परीक्षा सुरू होती. दरम्यान तिची पुतुलचे राजेशशी भेटीगाठी वाढल्या. फोनवर दोघांचे तासनतास बोलणे व्हायचेय त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. पुतुलला राजेश आपल्या बहिणीशी विवाह करतोय हे पटले नाही आणि तिने आत्महत्या करण्याची राजेशला धमकी दिली. राजेश घाबरला आणि त्याने कुटुंबियांना खरे सांगितले, तेव्हा मंडपात काहीकाळासाठी तणाव निर्माण झाला मात्र त्यानंतर त्यांचे लग्न लावून दिले.
























































