बिहारचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विनोद कुमार वर्तमान यांचे कोरोनाने निधन

बिहार येथील ज्येष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस विनोद कुमार वर्तमान यांचे कोरोनाने निधन झाले आहे. बिहार येथील पूर्णियाचे ते पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

वर्तमान हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. 16 ऑक्टोबर रोजी कोरोनाने संक्रमित झाल्याच अहवाल आल्याने पाटणा येथील एम्स रुग्णालयात दाखल होते. गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वर्तमान हे बिहार पोलीस दलातील एक मोठे अधिकारी होते. बिहार पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर 2011मध्ये ते आयपीएस झाले होते. बिहार सरकारने 13 ऑगस्ट 2019 पासून त्यांना पूर्णिया येथील आयपीएस म्हणून नियुक्त केलं होतं.

बिहार येथील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास राज्यात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील 991 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सगळ्यात अधिक संक्रमित जिल्हा पाटणा असून जिल्ह्यात कोरोनाने 244 मृत्यू झाले आहेत. दोन लाखांपैकी जवळपास 1 लाख 91 हजार रुग्ण बरे झाले असून सध्या दहा हजारांच्या आसपास रुग्णसंख्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या