
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत असताना एका गर्भवती महिला विद्यार्थिनीला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने परीक्षा केंद्रावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या माता आणि बाळ दोन्ही सुरक्षित आहेत.
ही घटना शनिवारी थाटिया गावातील शशी कृष्णा महाविद्यालयात घडली. बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी असलेली रविता कुमारी ही विद्यार्थिनी बीए (BA) अर्थशास्त्राचा पेपर देण्यासाठी केंद्रावर आली होती. परीक्षा सुरू असतानाच तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या.
शिक्षिकेच्या मदतीने वर्गातच प्रसूती रविताची प्रकृती बिघडलेली पाहून तेथे तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने एका रिकाम्या वर्गात हलवले. महाविद्यालय प्रशासनाने लगेच रुग्णवाहिकेला फोन केला, मात्र मदत येण्यापूर्वीच महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने रविताची सुरक्षित प्रसूती झाली.
माता आणि बाळ सुरक्षित प्रसूतीनंतर काही वेळातच रुग्णवाहिका महाविद्यालयात पोहोचली आणि माता-बाळाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी अंती दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले आहे.
रविता कुमारी ही भरद्वाज महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिचे लग्न शिवम कुमार याच्याशी झाले आहे. प्रसूतीचे दिवस जवळ आले असतानाही शिक्षणाप्रती असलेली तिची जिद्द पाहून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. परीक्षा केंद्रात अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज गुंजल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.




























































