
बिहारमध्ये एनडीएतील घटक पक्ष असणाऱ्या विकासशील इंसान पक्षाला (VIP) भाजपने (BJP) मोठा झटका दिला आहे. कारण विकासशील इंसान पक्षाच्या 3 आमदारांनी (MLA) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाचे संस्थापक व बिहार सरकार मधील मंत्री मुकेश सहनी हे त्यांच्या पक्षात एकटे पडले आहेत. भाजपने आता सहनी यांचे मंत्रीपदही काढून घेण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. व्हीआयपीचे 3 आमदार भाजपमध्ये सामील झाल्याने भाजपच्या आमदारांची संख्या 74 वरून 77 झाली आहे. राजदचे 75 आमदार असून आतापर्यंत बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सगळ्यात मोठा पक्ष होता. नव्या घडामोडींनंतर राजदला पाठी टाकत भाजप बिहारमधला मोठा पक्ष बनला आहे.
व्हीआयपीचे आमदार राजू सिंह, मिश्री लाल आणि सवर्णा सिंह या 3 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी तिन्ही आमदारांना मान्य़ता दिली आहे. मागील काही दिवसांपासून सहनी यांचे भाजपसोबत मतभेद सुरु होते. बिहारमधील बोचहा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघाचे आमदार मुसाफीर पासवान यांचा मृत्यू झाल्याने इथे पोटनिवडणूक होत आहे. पासवान हे व्हीआयपीचेच आमदार होते. यामुळे इथे व्हीआयपीने आपला उमेदवार देणं निश्चित केलं होतं. असं असतानाही भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवला आहे. व्हीआयपी पक्षातून भाजपमध्ये जाण्यापूर्वी तीनही आमदारांनी सहनी यांच्याविरोधात भूमिका घेत आपण भाजप उमेदवारालाच पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. हा सहनी यांच्यासाठी पहिला झटका होता. सहनी यांच्या पक्षातून निवडून आलेल्या तीनही आमदारांनी बोचहा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्वतःच्या पक्षाच्या उमेदवार गीता देवी यांच्याऐवजी भाजपच्या उमेदवार बेबी कुमारी यांना समर्थन दिले होते. तसे पत्र या तीन आमदारांनी बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांना दिले होते.
बोचहा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत VIP पक्षाचा उमेदवार उभा असणे भाजपाला रुचले नाही. त्यामुळे भाजपने थेट सहनी यांच्या पक्षाचे आमदार स्वतःच्या गळाला लावले. VIP च्या तिन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मंत्री मुकेश सहनी एकटे पडले आहेत. त्यांचा पक्ष आता बिना आमदारांचा पक्ष झाल्याने मुकेश सहनी यांचे मंत्रीपद देखील धोक्यात आले आहे. 30 जून रोजी सहनी यांची विधानपरिषदेची सदस्यता संपणार आहे.
2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत VIP पक्षाचे 3 आमदार निवडून आले होते. हे तीनही आमदार पूर्वी भाजपमध्ये होते, मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी सहनी यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. बिहारमध्ये एनडीएचा घटकपक्ष असूनही व्हीआयपीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 53 जागा लढवल्या होत्या. भाजपच्या विरोधात सहनी यांनी उमेदवार दिल्याने त्यांच्यावर भाजप नेते नाराज झाले होते. सहनी हे सातत्याने भाजपच्या विरोधात बोलत असल्याने त्याचाही राग भाजप नेत्यांच्या मनात होता.

























































