बिल्किस बानोची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेविरोधात बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळण्यात आली आहे. गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच पीडिता बिल्किस बानो यांनीही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

15 ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने पेंद्र सरकारच्या मंजुरीनंतर बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. या सुटकेला विरोधकांसह सीबीआय आणि विशेष न्यायालयानेही विरोध दर्शवला होता. गुजरात सरकारच्या या निर्णयानंतर बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली, मात्र न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने ही याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक रजिस्टार यांनी बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांना याविषयीचे निर्देश देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका 13 डिसेंबर रोजी फेटाळण्यात आल्याचे गुप्ता यांना सांगण्यात आले.