
श्रीमंतांच्या टॉप 10 यादीतून बिल गेट्स बाहेर
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 मधून बाहेर फेकले गेले आहे. त्यांची संपत्ती आता केवळ 123 अब्ज डॉलर असल्याने त्यांना 12 व्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सने श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली असून यामध्ये लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत दुसरे व्यक्ती बनले आहे. त्यांची एकूण संपत्ती 257 अब्ज डॉलर आहे, तर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे 366 अब्ज डॉलरसह श्रीमंतीत अव्वल आहेत. हिंदुस्थानी उद्योगपती मुकेश अंबानी हे 131 अब्ज डॉलरसह 11 व्या स्थानावर आहेत, तर गौतम अदानी यांनी 85.6 अब्ज डॉलरसह टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे.
अर्चना पूरन सिंहची ऑनलाईन फसवणूक
बॉलीवूड अभिनेत्री अर्चना पूरन सिंहची दुबईत आर्थिक फसवणूक करण्यात आली. अर्चना पूरन सिंह आपल्या पती आणि मुलासोबत दुबईत फ्लाई दुबई स्काईडाइविंगसाठी ऑनलाइन तिकीट बुक केले होते, परंतु ही ऑनलाईन तिकीट बुकिंग बनावट निघाली. अर्चना यांचा मुलगा आर्यमान याने ही बुकिंग केली होती, परंतु घटनास्थळी पोहोचल्यानंतर अशी कोणतीच बुकिंग झाली नाही, असे स्काईडाइविंगच्या कर्मचाऱ्याने सांगितले. बनावट वेबसाईटवरून पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याने ही फसवणूक झाली आहे. अर्चनाने व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली.
1.17 कोटींहून अधिक आधारकार्ड निष्क्रिय
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि याची माहिती कुटुंबातील व्यक्तीने यूआयडीएआयकडे दिल्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधारकार्ड नंबर निष्क्रिय केला जाईल, अशी माहिती यूआयडीएआयने दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आधारकार्डचा दुरुपयोग केला जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधारकार्ड निष्क्रिय करणे सुरू केले असून आतापर्यंत लोकांचे आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. देशात जवळपास 1.55 कोटी मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
आयफोन 17 प्रोमधून टायटेनियम फ्रेम हटवले
आयफोन 17 सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. या सीरीजची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या फोनसंबंधी एक एक माहिती आता समोर येत आहे. आयफोन प्रो मॉडेल्समध्ये आतापर्यंत टायटेनियम फ्रेम दिले जात होते. परंतु, आयफोन 17 प्रोमध्ये टायटेनियम फ्रेम मिळणार नाही. आयफोन 17 च्या सीरीज मध्ये केवळ आयफोन 17 एअर मॉडलमध्ये टायटेनियम फ्रेम मिळणार आहे. तर आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये
अॅल्युमिनियम फ्रेम मिळू शकते.
टीसीएस कर्मचाऱ्यांना 100 टक्के टीव्हीपी
टाटा कन्सल्टेंन्सी सर्व्हिसेज (टीसीएस) कर्मचाऱ्यांना कंपनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी 70 टक्के कर्मचाऱ्यांना संपूर्ण व्हेरिएबल म्हणजेच टीव्हीपी मिळणार आहे, तर बाकीच्या कर्मचाऱ्यांना बिझनेस युनिटच्या परफॉर्मन्सच्या आधारावर व्हेरिएबल दिला जाणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सी टू ग्रेड अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 100 टक्के क्वॉर्टरली व्हेरिएबल अलाऊन्स मिळणार आहे.
























































