बिल गेट्स यांना 7अब्ज रुपयांचा चुना, पाकिस्तानी ठगाने घातला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स देखील फसवणुकीचे बळी ठरले आहेत. एका पाकिस्तानी व्यक्तीने बिल गेट्स यांना 7 अब्ज रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा चुना लावला आहे. एका पुस्तकात या संदर्भातला दावा करण्यात आला आहे.

‘The Key Man: The True Story of How The Global Elite was Duped by a Capitalist Fairy Tale’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. पुस्तकातील दाव्यानुसार आरिफ नकवी नावाच्या पाकिस्तानीने बिल गेट्स यांची 100 मिलियन डॉलर्स (सुमारे 7 अब्ज 41 कोटी रुपये) ची फसवणूक केली होती. Simon Clark आणि Will Louch हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तकात सांगण्यात आले आहे की, आरिफ नकवी हा ठग होता. जो अब्जाधीशांची फसवणूक करण्याचे काम करत होता.

एका रिपोर्टनुसार, आरिफ पाकिस्तानमधील एका खाजगी इक्विटी फर्मचा प्रमुख होता. तो जगभरातील गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या व्यवसायात पैसे गुंतवण्याचे काम करत करत होता. या दरम्यान त्यांनी बिल गेट्ससह अनेक श्रीमंत लोकांशी चांगले संबंध बनवले. नंतर याच संबंधांचा फायदा घेऊन, त्याने गुंतवणुकीसाठी बिल गेट्स यांच्याकडून मोठी रक्कम घेतली.

आरिफ नकवीने सुमारे 100 मिलियन डॉलर्सचा गैरव्यवहार केला होता. या रकमेच्या अर्ध्या रकमेचा कोणताही हिशेब अद्याप सापडला नाही. नकवीच्या एका कर्मचाऱ्याने सर्व गुंतवणूकदारांना ई-मेल पाठवून याबाबत माहिती दिली होती. या प्रकरणी त्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी आरिफ नकवी याची प्रतिष्ठा एवढी वाढली होती की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याला मुस्लिम व्यापारी नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. एवढेच नाही तर अमेरिकन सरकारने नकवीच्या एका कंपनीमध्ये काही कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. दरम्यान, लवकरच त्याला अटक केली जाईल असे बोलले जात आहे.