
आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडचा एक काळ गाजवणारे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनप्रवासावर आता बायोपिकची निर्मिती होणार आहे. राजेश खन्ना यांच्या बुधवारी असलेल्या 79 व्या जयंतीचे औचित्य साधून निर्माते निखिल द्विवेदी यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात राजेश खन्ना यांची भूमिका कोण साकारणार, याबाबत आतापासूनच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गौतम चिंतामणी यांच्या बेस्ट सेलिंग ‘डार्क स्टार ः द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकाचे हक्क निखिल द्विवेदी यांनी विकत घेतले आहेत. निखिल द्विवेदी म्हणाले, ‘‘गौतम चिंतामणी यांच्या ‘डार्क स्टार’ या पुस्तकाचे हक्क आम्ही विकत घेतले असून हा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक फराह खानसोबत माझी चर्चा सुरू आहे. सध्यातरी या बायोपिकबद्दल मी एवढीच माहिती देऊ शकतो. राजेश खन्ना यांचे चरित्र मोठय़ा पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.’’
चेतन आनंद यांच्या ‘आखरी खत’ या चित्रपटाद्वारे राजेश खन्ना यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. 1969 ते 1971 या तीन वर्षांत त्यांनी 17 सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यात त्यांच्या 15 सोलो चित्रपटांचा समावेश होता. त्यांचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. त्याकाळी त्यांची इतकी क्रेझ होती की, फिमेल फॅन्स त्यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवायच्या. 2012 साली कर्करोगाने राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. 2013 साली त्यांना ‘मरणोत्तर पद्मभूषण’ देण्यात आला होता.






























































