
कोरोनाला हरवण्याच्या दृष्टीने अनेक शुभ पावले उचलली जात आहेत. आपल्या राज्यात त्यानिमित्ताने पहिलाच पक्षी सप्ताह सुरू झाला आहे.
सध्या राज्यभरात सर्वच ठिकाणी पक्षी सप्ताह सुरू आहे. आमच्या सर्व जिह्यांतून या सप्ताहातील दैनंदिन घडामोडी रोज मला फोनद्वारे कळवण्यात येतात. पक्ष्यांच्या अभ्यासाचे एक वेगळे दालन पक्षी अभ्यासकांसाठी तयार व्हायला या सप्ताहामुळे नक्कीच मदत होईल. यापूर्वी असा पक्षी सप्ताह कधी साजरा झाला नव्हता. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी…सर्वांमध्येच पक्ष्यांची आवड आणि जनजागृती निर्माण होईल याची खात्री वाटते असे मत ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली व्यक्त करतात.
नोव्हेंबर महिना हा पक्षीतज्ञांचा अभ्यासाचा काळ…कारण या महिन्यात विविध पक्षी स्थलांतरित होतात…घरटी विणतात… राज्यातील जलाशयांवर तसेच जंगलांमध्ये याच दिवसांत येतात. या महिन्याचे पक्ष्यांसाठी असलेले महत्त्व तसेच ज्येष्ठ पक्षी अभ्यासक आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य आणि पक्षीविश्व आणि पक्षी अभ्यासशास्त्र्ा जागतिक स्तरावर पोहोचवणारे पक्षी अभ्यासक, पद्मभूषण स्व. डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त 12 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात पहिला पक्षी सप्ताह साजरा होत आहे. अनेक पक्षीप्रेमी संस्था आणि राज्य वन्य जीव मंडळातील सदस्यांचा या सप्ताहात सहभाग आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदुस्थानात पक्षी सप्ताह साजरा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
पक्ष्यांचे निसर्गातले महत्त्व, संकटग्रस्त पक्षी, पक्ष्यांचे स्थलांतरण, त्यांचा अधिवास, अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण संवर्धन कायद्याविषयी सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच पक्षी जगताविषयी आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती व्हावी हा या सप्ताहामागचा उद्देश आहे. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागातर्फे पक्ष्यांची सुरक्षितता आणि संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे.
पक्ष्यांच्या वैशिष्टय़पूर्ण घडामोडी
हजारो किलोमीटरचा प्रवास करून शहरात दाखल झालेल्या लाँग लेग बझार्ड या परदेशी स्थलांतरित पक्ष्याचे सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दर्शन झाले. हा पक्षी हिवाळ्यात हिमालयातून पाकिस्तान, आसाम, बांगलादेश आणि दक्षिणेकडे स्थलांतर करतो. कॉटन पिग्मी गुज, कॉमन कूट, ग्लॉसी आयबिस, व्हाईट आयबिस, अलेक्झांडरिन पॅराकिट, लेसर व्हिसलिंग डक, पाईड मैना, कॉमन मुरहेन, मधुबाज, कमळ पक्षी, बुटेड ईगल आणि इतर अशा 52 प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद या सप्ताहादरम्यान करण्यात आली. हे स्थलांतरित परदेशी पक्षी आहेत. ज्या राज्यात तलाव आहेत अशा ठिकाणी उथळ पाण्यात टायफा, हायड्रिला, पोटँमोगेटॉन, नाजास, लिम्रोफिला तसेच पानवेल आणि पाणकणीस या वनस्पती वाढल्यामुळे पाणपक्षीही बघायला मिळत आहेत.
शालेय विद्यार्थांकरिता
अनोखे कार्यक्रम
पक्षी सप्ताहामुळे पक्ष्यांची सुरक्षितता आणि संवर्धन करणे हे उद्देश साध्य होण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांकरिता पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, निबंध स्पर्धा, कार्यशाळा आणि माहितीपटाचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचे आयोजन करणे, पक्षीगण, अधिवास स्वच्छता, पक्षी अभ्यास असे अनेक कार्यक्रम यावेळी राबवण्यात येत आहेत.
पक्षी सप्ताहाची आवश्यकता…
दिवसेंदिवस अनेक पक्षी लोप पावत आहेत. शहरातून चिमण्यादेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही वेळा त्यांच्यावर हल्ले होतात. हे पक्षी वाचलेच पाहिजेत. जगले पाहिजेत, वाढले पाहिजेत. पक्ष्यांच्या अद्भुत आणि अफाट विश्वाचं ज्ञान मिळालं पाहिजे. त्यांच्या असण्या-नसण्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासता आला पाहिजे अशा अनेक कारणांनी पक्षी सप्ताहाचं महत्त्व आहे. त्यामुळेच काही मार्गदर्शक सूचना या सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात येणार आहेत, असे मत पक्षी तज्ञ डॉ.जयंत वडतकर व्यक्त करतात.



























































