स्वच्छंद

1202

विद्या कुलकर्णी,[email protected]

आजच्या लेखामध्ये कोंबडीच्या जातीतील परंतु अतिशय सुंदर अशा काळ्या व राखाडी रंगाच्या फ्रँकोलीन पक्ष्याविषयी आपण जाणून घेऊया.

काळे तित्तर

हिमालयात पक्ष्यांच्या छायाचित्रणासाठी हिंडत असताना लांबूनच ‘चीक चीक केरेकेक’ असा अतिशय स्वरबद्ध आवाज ऐकू आला. आमच्या बरोबरीच्या गाईडने लगेच ओळखले व मला नाजुक नक्षीदार पक्षी पाहावयास मिळाला. खरोखरच निसर्गाची अप्रतिम निर्मिती पाहून मी थक्क झाले!

काळ्या तनूवर अंगरखा तपकिरी नक्षीदार

कंठात शोभे जणू मणिकांचा सुंदर हार

या पक्ष्याचा आकार साधारण 30-35 सेंटिमीटर असतो. त्याचे भुंडे शेपूट काळ्या कुळकुळीत रंगाचे असून त्यावर पांढऱया आणि पिंगट रंगाचे ठिपके व पट्टे असतात. त्याचे गाल चकाकणारे पांढरे व गळपट्टा काळसर तांबडा असतो. सबंध अंगभर नाजुक तपकिरी तांबूस रंगाची नक्षी असून पाय लालसर तपकिरी असतात. या पक्ष्याचे पाय बळकट असल्यामुळे तो खूप वेगाने पळू शकतो. नराच्या तुलनेत मादीचा रंग फिक्का असून तिच्या शेपटीवरील पट्टे रुंद व विरळ असतात. तिच्या गळ्यावर तांबडा पट्टा नसतो व गाल अधिकच हलक्या रंगाचे असतात.

काळे तित्तर उत्तर हिंदुस्थान व आसाममधील उंच गवताच्या जंगलात, नदीकाठी झुडुपात व पाण्यालगत वाढणाऱया झाडांमध्ये आढळतात. हा सुंदर पक्षी नेहमीच शेपूट वर करून एकटा किंवा जोडीने हिंडत असतो. काही धोका जाणवल्यास लगेच उंच गवतामध्ये लपतो किंवा झाडावर उडून बसतो.
हे पक्षी शेतातील दाणे, कीटक खाण्यासाठी सकाळी व संध्याकाळी शेतात चोची मारत हिंडताना आढळतात. त्यांचे मुख्य अन्न दाणे, गवताचे बी, कोवळ्या फांद्या असले तरी ते वाळवी किंवा इतर किडेही चवीने खातात. आपल्या पिलांना खाणे भरवताना ते अतिशय दक्ष असतात.

नर मादीचे लक्ष वेधून घेण्यासाठी खडकावर किंवा बुटक्या झाडावर उभा राहून अतिशय मोठय़ा आवाजात साद देतो व खूपच आग्रही होतो. या पक्ष्यांमध्ये नर-मादी एकनिष्ठ असतात. अंडी घालण्याच्या सुमारास ते नेहमी सुरक्षित ठिकाणी राहतात. मादी एकावेळी 10 ते 14 अंडी घालते व त्यांना उबवण्याचे काम ती एकटीच करते. साधारण 18 ते 19 दिवसांनी पिले बाहेर येतात. या पक्ष्याचे फोटो मी राजाजी जंगल व सत्ताल येथे काढले आहेत.

titar-ff

राखी तित्तर

राखी तित्तर किंवा तित्तूर हा गावठी कोंबडीच्या आकाराचा पक्षी आहे. हे पक्षी हिंदुस्थानी द्वीपकल्पात समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीपर्यंतच्याच भागात हिमालयाच्या पायथ्याशी व आजूबाजूच्या प्रदेशात सापडतात. सहसा त्यांचे वास्तव्य खेडय़ापाडय़ांच्या आसपास आणि गवताळ प्रदेशात असते. काटेरी झुडुपांचा आणि कमी पावसाचा प्रदेश या पक्ष्याला अधिक मानवतो.

साधारण 60 सें.मी. आकाराच्या या पक्ष्याचे अंग करडय़ा तपकिरी रंगाचे असून त्याच्या अंगावर ठिपके, रेघा आणि पट्टे असतात. त्याची शेपूट भुंडी (आखूड) असते. शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो. नर आणि मादी सारखेच दिसतात, परंतु नर हा मादीपेक्षा बळकट असतो. नराच्या दोन्ही पायांवर आऱया (छोटय़ा आकारची नखे असलेली बोटे) असतात. त्याचा उपयोग त्यांना पळताना होतो. आऱयांचा उपयोग नर मादीसाठी झुंजताना करतात. करमणुकीसाठीसुद्धा या पक्ष्यांच्या झुंजी लावल्या जातात.

राखी तित्तर हे पक्षी काटेरी झाडांवर रात्रीची वस्ती करतात. पहाट झाली की पंखांचा फडफडाट करत जमिनीवर उतरतात. बरेच वेळा हे पक्षी 4 ते 6च्या गटाने इकडे तिकडे ताठ राहून पळताना दिसतात. कोंबडय़ांसारखे माना खाली घालून, पायांना असलेल्या नख्यांनी जमिनी उकरून त्यातून सापडलेले दाणे व कीटक ते खातात.

शिशू पक्ष्यांच्या अंगावर नक्षी नसते व ते माणसांच्यात फार पटकन मिसळतात व कुत्र्याप्रमाणेच हाक मारली की लगेच मालकाकडे धावत जातात. या पक्ष्याचा प्रजननाचा काळ निश्चित नसतो. स्थानिक परिस्थितीप्रमाणे, म्हणजे पावसाचे प्रमाण, पिके घेण्याच्या पद्धती आणि खाद्याच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांचे प्रजनन होते. पक्षीनिरीक्षकांना जवळ जवळ वर्षभर याची घरटी सापडली आहेत. काटेरी झुडुपांच्या मोकळ्या प्रदेशात किंवा शेताच्या आसपासच्या जमिनीवर खाचखळग्यात ते घरटे बांधतात. मादी त्यात सुमारे 4 ते 8 अंडी घालते. अंडी तपकिरी, फिकट पिवळ्या रंगाची, दुधावरच्या सायीसारखी दिसतात. नर व मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात.

आपली प्रतिक्रिया द्या