मारुतीरायाचे जन्मस्थान कोणते? नाशिकच्या शास्त्रार्थ बैठकीत वादाची हनुमान उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हनुमान जन्मस्थळावरून वाद निर्माण केल्याने नाशिकमध्ये मंगळवारी आयोजित धर्मसभेत साधू, महंत, तज्ञांमध्ये आपसात वादावादी झाली. बाचाबाची, हमरीतुमरीवरून थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाणे आणि प्रसारमाध्यमांचा बूमच उगारण्यापर्यंत प्रकरण गेल्याने धर्मसभाच गुंडाळण्यात आली.

त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी नाही तर कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमान जन्मस्थळ आहे, असा दावा किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला होता. धर्मरथासह ते चार दिवस त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी होते. त्यांच्या निषेधार्थ सोमवारी अंजनेरीचे ग्रामस्थ व साधू, महंतांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे पोलीस बंदोबस्तात त्यांचा धर्मरथ नाशिकमध्ये आणण्यात आला. आज मंगळवारी सकाळी दहापासून नाशिक येथील अनिकेतशास्त्री देशपांडे यांच्या आश्रमात धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीलाच गोविंदानंद सरस्वती हे सोफ्यावर विराजमान झाल्याने वाद झाला. यानंतर सर्वांना समान आसनव्यवस्था करून हनुमान जन्मस्थळाबाबत मंथन सुरू झाले.

नाशिकचे श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, महंत भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, देवांग जानी, वेदमूर्ती शांताराम भानोसे, भालचंद्रशास्त्री शौचे आदींनी अंजनेरी हेच हनुमंतांचे जन्मस्थळ आहे, याचे दाखले दिले. किष्किंधा हे जन्मस्थळ असल्याचे शास्त्रोक्त दाखले, पुरावे मात्र स्वामी गोविंदानंद देवू शकले नाही. त्यांचे गुरू कोण, जगद्गुरू कोण, हेही ते व्यवस्थित सांगू शकले नाहीत. त्यांनी ज्या जगद्गुरूंचे नाव घेतले त्यांच्याकडे काँग्रेसचे नेते पूर्वीपासून येतात, असे महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटल्यानंतर गोविंदानंद सरस्वती संतापले आणि वाद आणखी चिघळला.

गोविंदानंदांना किष्किंधाकडे रवाना करा

जगद्गुरूंचा अपमान केल्याबद्दल माफी मागा, असा हट्ट गोविंदानंदांनी धरला. त्यात हनुमान जन्मस्थळाचे मंथन बाजूलाच राहिले. यातून हमरीतुमरी, एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत वाद पेटला. महंत सुधीरदास यांनी संतापात मीडियाचा बूमच गोविंदानंद यांच्यावर उगारला अन् शेवटी धर्मसभाच गुंडाळली गेली. आता कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गोविंदानंदांना किष्किंधाकडे रवाना करा, अशी मागणी नाशिकच्या साधू, महंतांनी केली आहे.