भाजपाचे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटेंना नगराध्यक्षांशी हुज्जत घालणे महागात; कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत शुल्लक विषयावरून विरोधी भाजपाचे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे नगराध्यक्षांच्या अंगावर धावून गेले. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत शुल्लक विषयावरून विरोधी भाजपाचे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे हे आपल्या अंगावर धावून आले. तत्कालीन मुख्याधिका-यांच्या अंगावर धावून जात, खुर्ची मारण्याचा प्रयत्न त्यांनी यापूर्वीही केला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या बाबतीत जो प्रकार घडला, तसाच प्रकार माझ्या बाबतीत घडेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर व्यक्ती पासून माझ्या जिवास धोका आहे. सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांशी सभागृहात हुज्जत घालणे भाजपाच्या गणेश भोगटे यांना चांगलेच अंगलट येणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या नेतृत्वाखाली न.पं.तील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, किरण शिंदे, संतोष शिरसाट, नगरसेविका सौ.सई काळप, सौ.अक्षता खटावकर, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रुती वर्दम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, अल्पसंख्यांक सेलचे तबरेज शेख आदी उपस्थित होते.

नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या प्रकाराबाबत नगराध्यक्षा करोल यांनी पोलिस निरीक्षक चिंदरकर यांचे लक्ष वेधत निवेदनही दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा 25 एप्रिल 2023 रोजी 11 वाजता कुडाळ नगरपंचायत सभागृहात बोलविण्यात आली होती. या सभेस गणेश भोगटे हे दुपारी 12 वाजल्यानंतर उपस्थित झाले. नगरपंचायतीच्या हजेरी बुकावर ते सही करत असताना मागील 5 अनुपस्थित सभेच्या हजेरी बुकावर सह्या केल्या, हे माझ्या लक्षात आल्यावर मी विरोधी भाजपाचे गटनेते व त्यांना याबद्दल विचारणा केली असता स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे माझ्या अंगावर धावून येत हातवारे करु लागले. हा प्रकार घडत असताना नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सभा अधिक्षक, सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित हा प्रकार घडला आहे. या व्यक्तीने कुडाळ नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी नितिन गाढवे यांच्या अंगावर धावून जात खुर्ची मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच अर्वाच्च भाषाही वापरली होती. या प्रकरणी कुडाळ पोलिस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रवीष्ठ आहे. सदर व्यक्तीने स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीवेळी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता. सदर व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार केला असता मी कुडाळ शहराची प्रथम नागरिक असून मी एक महिला आहे. जसे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या बाबतीत जो प्रकार घडला तसा प्रकार माझ्या बाबतीत घडेल याची शक्यता नाकारता येत नाही. सदर व्यक्ती पासून माझ्या जिवास धोका आहे. तरी सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल यांनी निवेदनाद्वारे कुडाळ पोलिसांकडे केली आहे.